अकोला : शहरात गुंडगिरीचे प्रमाण वाढले आहे. शस्त्राचा धाक दाखवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न गुन्हेगारांकडून केला जातो. गोरक्षण मार्गावर एक तरुण हातात कोयता शस्त्र घेऊन फिरत असतांना एका जागृत नागरिकाने त्याची चित्रफित तयार करीत ती पोलिसांना पाठवली. अकोला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी तत्काळ त्याची दखल घेऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपी तरुणाला ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

समाज माध्यमांच्या प्रभावात असलेले तरुण गुन्हेगारी कारावायांकडे वळत आहेत. शस्त्रांचे तरुणांना आकर्षण असते. परिसरात धाक निर्माण करण्याकडे त्यांचा कल असतो. पोलिसांकडून अशा गावगुंडांचा बंदोबस्त केला जात आहे. शहरातील गोरक्षण मार्गावर धारदार लोखंडी शस्त्र कोयता घेऊन बबलू उर्फ शंकर धनेश्वर राऊत (रा. व्हिएचबी कॉलनी, गोरक्षण मार्ग, अकोला.) हा दहशत पसरवण्याचा प्रयत्न करीत होता. एका जागृत नागरिकाला शस्त्रासह हा तरुण दिसून आल्याने त्यांनी तरुणाची चित्रफित काढली. ती स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना पाठवली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी पथक घटनास्थळावर पाठवले. आरोपी तरुणाचा शोध घेऊन त्याला शस्त्रासह ताब्यात घेतले. आरोपीकडून शस्त्र जप्त करण्यात आले असून त्याच्या विरूद्ध खदान पोलीस ठाण्यात कलम ४, २५ आर्म ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास खदान पोलीस करीत आहेत. शस्त्र घेऊन फिरणे तरुणाला चांगलेच भोवले आहे.

घरफोडी प्रकरणातील आरोपी २४ तासांत गजाआड

अकोट फैल येथील अमिनोद्दिन महेमुदुल हसन हे घराबाहेर असतांना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरातील सहा लाख रुपये रोख व १० ग्रॅम सोन्याचे बिस्किट असा एकूण सहा लाख ७० हजाराचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी अकोट फैल पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला. पोलीस निरीक्षक शेख रहीम यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात तत्काळ घटनास्थळाची पाहणी करून तपास केला. वेगवेगळे पथक तयार करून आरोपीची गुन्हा करण्याची पद्धत, तांत्रिक तसेच बौध्दिक कौशल्याचा वापर केला. आरोपी खिबर उर रहमान मोबीन उर रहमान याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्याने घरफोडी केल्याची कबुली दिल्याने त्याला अटक केली. दोन मोबाइल, गुन्ह्यातील सोने व रोख रक्कम असा एकूण पाच लाख दोन हजार चार रुपयांचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त केला. पुढील तपास अकोट फैल पोलीस करीत आहेत.