अकोला : शहरात आता तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. जलसाठ्यात वाढ झाल्याने महापालिका प्रशासानाने हा निर्णय घेतला. त्यामुळे अकोलेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.अकोला महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा योजनेसाठी मुख्य जलस्त्रोत काटेपूर्णा प्रकल्प (महान) आहे. भरपावसाळ्यात जून महिन्यात महापालिकेने पाणीकपात केली होती. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महान धरणातील पाणी पातळीत घट झाल्यामुळे शहरातील पाणीपुरवठा सहाऐवजी सात दिवसाआड केला होता.

ऐन पावसाळ्यात अकोलेकरांवर पाणी संकट कोसळले होते. १६ जून रोजी प्रकल्पामध्ये ११.९१ टक्के जलसाठा शिल्लक होता. धरणातील पाणी साठ्यामध्ये झपाट्याने घट होत होती. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. सात दिवसाआड मिळणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. गेल्या महिन्याभरात मात्र चित्र पालटले आहे. जिल्ह्यात जूनच्या शेवटच्या आठवड्यात व जुलैच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये दमदार पाऊस कोसळला. जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाणी साठ्यात मोठी वाढ नोंदवल्या गेली. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महान येथील प्रकल्पात सुद्धा पाणी साठ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. या प्रकल्पात १७ जुलै रोजी २४.४२ टक्के पाणी साठा उपलब्ध झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सद्यस्थितीत दिवसेंदिवस धरणातील पाणी साठ्यामध्ये वाढ होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे आठवड्यातून एक दिवस होणारा पाणी पुरवठा आज, १८ जुलैपासून तीन दिवसाआड म्हणजेच चौथ्या दिवशी करण्यात आला आहे. ६५ एमएलडी प्रकल्पावरील महाजनी जलकुंभ, मोठी उमरी, गुडधी जलकुंभ, नेहरू पार्क जलकुंभ, तोष्णीवाल जलकुंभ, आदर्श कॉलनी जलकुंभ, केशव नगर जलकुंभ, रेल्वे स्टेशन जलकुंभ, गंगा नगर जलकुंभ, अकोट फैल जलकुंभ, जोगळेकर प्लॉट जलकुंभ, लोकमान्य नगर जलकुंभ तसेच २५ एलएलडीवरुन होणारा पाणी पुरवठा शिवनगर, आश्रय नगर व बस स्टॅन्ड मागील जलकुंभावरुन, शिवणी जलकुंभ, शिवर जलकुंभ, शिवापुर जलकुंभवरून होणारा पाणीपुरवठा तीन दिवसाआड करण्यात आला आहे. शहरातील नागरिकांनी पाण्याची पुरेशी साठवणूक करून पाण्याचा योग्य वापर करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन अकोला महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे. महान धरणातील पाणी साठ्यात मोठी वाढ झाल्याने अकोलेकरांवरील जल संकट टळले आहे. तीन दिवसाआड होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांची पाणी समस्या टळण्यास मदत होईल.