अकोला : शहरातील बहुचर्चित अक्षय नागलकर हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी नवव्या आरोपीला गजाआड केले. तपासामध्ये पोलिसांनी मृताच्या हाडाचे तुकडे जप्त केले आहेत. याशिवाय हत्याकांडासाठी वापरलेले पिस्तूल, चारचाकी वाहन देखील पोलिसांनी शोधून काढले. हे नियोजित हत्याकांड असून यासाठी आरोपींनी चक्क हॉटेल भाड्याने चालवण्यासाठी घेतले होते.

शहरातील अक्षय विनायक नागलकर (वय २६ वर्ष) हा २२ ऑक्टोबरला बेपत्ता झाला होता. शोध घेण्यासाठी पोलिसांची आठ पथके गठीत केले. अक्षय नागलकर याची चंद्रकांत बोरकर यांने कट रचून साथीदारांच्या मदतीने गायगाव मार्गावरील एम.एच. ३० या हॉटेलमध्ये हत्या केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी चंद्रकांत बोरकर, आशिष वानखडे, श्रीकृष्ण भाकरे, अशोक भाकरे यांना अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रोहित पराते, अमोल उन्हाळे यांना अहिल्यानगर येथून आकाश शिंदे याला भुसावळ व नारायण मेसरे याला बाळापुरातून गजाआड केले. नववा आरोपी शिवहरी रविंद्र माळी याला बैतुल मध्यप्रदेश येथून अटक केली.

आरोपींकडून हत्याकांडाचा उलगडा झाला आहे. मृतक अक्षय नागलकर याचा भाऊ शुभम विनायक नागलकर हा चंद्रकांत बोरकर याच्या सोबत झालेल्या वादामुळे एम.पी.डी.ए. कायद्यान्वये एक वर्षासाठी कारागृहात स्थानबध्द झाला. यावरून अक्षय याने चंद्रकांत बोरकरला धमकावले होते. त्यामुळे बोरकर याने गत काही महिन्यापासून अक्षय नागलकर याची हत्या करण्याचा कट रचला. त्याने सर्व आरोपीना वेगवेगळ्या कारणाने विश्वासात घेतले. हत्या करण्यासाठी ब्रम्हा भाकरे याच्यामार्फत बंद पडलेले हॉटेल चालवण्यासाठी घेतले. मृतदेह जाळून विल्हेवाट लावण्यासाठी मोरगाव भाकरे शेत शिवारात टीन पत्राचे शेड उभारले. लाकडे अगोदरच आणून ठेवली होती.

हॉटेलमध्ये जेवणासाठी बोलावून हत्या करण्यात आली. त्यानंतर शेतातील टीनशेडमध्ये मृतदेह जाळण्यात आला. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले एक चारचाकी, तीन दुचाकी वाहने, सात मोबाइल, सहा जिवंत काडतुस जप्त केले. या प्रकरणात आरोपींनी हत्या करीत मृतदेह  जाळून त्याची राख नदीत फेकण्यासह पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मृतदेह न मिळाल्यास निर्दोष सुटू, असा आरोपींचा कट होता. मात्र, पोलिसांनी तो कट उधळून लावला आहे. पोलीस अधीक्षक अर्जीत चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधीकारी सुदर्शन पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेळके, डाबकी रोडचे प्रभारी अधिकारी अभिषेक अंधारे यांच्या नेतृत्वात पथकांनी तपास केला.