अकोला : नभोमंडपात आजवर दाटलेले मेघ काहीसे विलग होऊन ढगा पलिकडील सुंदर जग दर्शन करण्यासाठी सज्ज झाले आहे. यंदा स्वातंत्र्य महोत्सवात अवकाशात विविध घडामोडी होणार असून आकर्षक आकाश अनुभूतीची पर्वणी लाभणार आहे. या स्वातंत्र्याच्या महापर्वात सहभागी होत अनोख्या खगोलीय घटनेचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन विश्वभारती केंद्राचे संचालक प्रभाकर दोड यांनी केले आहे.

आज, ९ ऑगस्टपासून सर्व पाच ग्रहांचे दर्शन होणार आहे. पहाटे पूर्व आकाशात बुध ग्रह, सोबत जरा वर गुरु व शूक्र ग्रह, संध्याकाळी पश्चिमेस मंगळ, रात्री दहा नंतर पूर्वेस शनी असे सर्व ग्रह दर्शनास खुले राहतील. दक्षिण आकाशात अगस्तोदय गेल्या पावणे तीन महिन्यांपासून लुप्त असलेला अगस्त्य तारा मनमोहक दर्शनास सज्ज आहे.

श्रावण पौर्णिमेचा चंद्र गरुड तारका समूहातील श्रवण नक्षत्रात बघता येईल. १२ ऑगस्टला रात्री १० वाजतानंतर पूर्व आकाशात अंगारकी चतुर्थीला मीन राशीत चंद्र आणि शनी ग्रह युती आणि पहाटे सर्वात मोठा ग्रह गुरु व सर्वात तेजस्वी शूक्र ग्रह युती स्वरूपात मिथुन राशीत अगदी जवळ राहतील. दोन महाग्रहांची युती एक अपूर्व अनुभूती राहणार आहे, असे प्रभाकर दोड यांनी सांगितले.

१२ व १३ ऑगस्टला रंगीबेरंगी उल्का वर्षाव

रंगीबेरंगी उल्का वर्षाव १२ व १३ ऑगस्टला पूर्व आकाशात कृत्तिका नक्षत्राच्या जवळ ययाती तारका समूहातून विविध रंगांच्या उल्का पडताना दिसतील. पहाटे यांचे प्रमाण वाढून दरताशी ९० पर्यंत राहील. १४ ऑगस्ट रोजी चंद्र व पृथ्वी तीन लाख ६९ हजार ३०० कि.मी. एवढ्या कमी अंतरावर राहणार आहे. त्यामुळे चंद्र आकाराने मोठा दिसेल, असेही प्रभाकर दोड म्हणाले.

स्वातंत्र्य दिनी आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन केंद्राची सलामी

१५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहत साजरा केला जातो. या दिवशी आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन केंद्राची सलामी पहाटे ५.१७ ते ५.२२ या वेळात दिली जाणार असून ही एक पर्वणी ठरेल. लखलखत्या चांदणीच्या स्वरूपात नैॠत्य ते ईशान्येस नुसत्या डोळ्यांनी आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन केंद्र पाहता येईल. क्रांती दिन ते स्वातंत्र्य दिनपर्यंत अवकाशातील आकर्षक व चित्तथरारक अवकाश पर्वणीचा आनंद सगळ्यांनी घ्यावा, असे आवाहन प्रभाकर दोड यांनी केले आहे.