चंद्रपूर : महाऔष्णिक वीज केंद्राच्या इरई धरणातील पाण्याची पातळी २०७.४२५ मीटर पर्यंत वाढल्याने दुपारी दोन वाजताच्या सुमारास धरणाचे सातही दरवाजे उघडण्यात आले आहे. दरम्यान नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच दीड दिवसांच्या गणपती मूर्तींचे विसर्जन असल्याने नागरिकांनी सावधता बाळगत विसर्जन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. तर सायंकाळ पासून रिमझिम पाऊस सुरू झाला आहे.
या जिल्ह्यात गणपती आगमनाच्या दिवशी म्हणजे २७ ऑगस्ट रोजी दुपारी व रात्री चांगला पाऊस झाला. त्यानंतर आज २८ ऑगस्ट गुरुवार रिमझीम पावसाने हजेरी लावली. तर इरई धरणाच्या गाभा क्षेत्रातही पाऊस चांगला पडला. त्यामुळे इरई धरण ९८ टक्क्यांपेक्षा अधिक भरले आहे. इरई धरणातील पाण्याची पातळी २०७.४२५ मीटर आहे. तसेच हवामन खात्याने येत्या एक दाेन दिवसात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
धरणातील तुडूंब जलसाठा बघता महाऔष्णिक वीज केंद्राने दुपारी दोन वाजताच्या सुमारास इरई धरणाचे १, ४, ३, ५ आणि ७ असे पाच गेट ०.५ मीटरने तर २ व ६ क्रमांकाचा गेट ०.२५ मीटरने उघडले आहे. त्यामुळे इरई नदीतील पाण्याची पातळी अचानक वाढली आहे. दरम्यान धरणाचे सर्वच सात गेट उघडे करण्यात आले असल्याने इरई नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच सध्या गणेशोत्सवाची धामधुम सुरू आहे.
दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन सुरू असल्याने नागरिकांनी गणपती विसर्जन करतांना विशेष काळजी घ्यावी असेही आवाहन जिल्हा व महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. सध्या पावसाळी वातावरण आहे. तेव्हा नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी आणि कुठलीही अनुचित घटना घडू नये याची दक्षता घ्यावी असेही आवाहन केले आहे.