राजेश्वर ठाकरे, लोकसत्ता

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संपादित समता आणि जनता या नियतकालिकांच्या पुनर्मुद्रणाचे २४ खंड तयार करण्याची पाच वर्षांची मुदत संपली असून त्यासाठी करण्यात आलेला सामंजस्य करार देखील संपुष्टात आला आहे. आजवर केवळ एका खंडाचे प्रकाशन झाले आहे. त्यामुळे उर्वरित २३ खंडांचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बाबासाहेब संपादक असलेले समता आणि जनता या नियतकालिकांचे संकलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे विशेष कर्तव्यावर असलेले माजी अधिकारी वसंत मून यांनी मोठय़ा कष्टाने केले. परंतु, त्यांचे निधन झाल्याने त्यांच्या संकलनातील सर्व पुस्तके, नियतकालिके आणि  साहित्य त्यांच्या कुटुंबीयांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर विचारधारा विभागास दान केले. या नियतकालिकांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन या सर्व नियतकालिकांच्या पुनर्मुद्रणासाठी स्कॅनिंग करून देण्याची विनंती उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडे पत्राद्वारे केली. त्यानुसार  विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती यांच्यात १५ डिसेंबर २०१६ रोजी सामंजस्य करार झाला. त्या करारानुसार समता नियतकालिकांच्या २१ जून १९२८ ते १५ मार्च १९२९ एक खंड आणि जनताचे  – २४ नोव्हेंबर १९३० ते २८ जानेवारी १९५६ अशा एकूण २३ खंडांच्या पुनर्मुद्रणाचे एकूण २४ खंड पाच वर्षांत तयार करावयाचे होते. त्यापैकी केवळ जनता हा सोर्स मटेरियल खंड ३-१ समितीचे तत्कालीन सदस्य डॉ. कृष्णा कांबळे यांच्या काळात १४ एप्रिल २०२१ रोजी प्रकाशित झाला. म्हणजे सामंजस्य करारानंतर ४ वर्षे चार महिन्यानंतर पहिला खंड प्रकाशित झाला. तो वाचकांना १६ डिसेंबर २०२१ ला उपलब्ध झाला.  हा खंड २०१८ पासून तयार होता. आता सामंजस्य कराराची मुदत संपली आहे आणि २३ खंड तयार व्हायचे आहेत. 

हे खंड वाचकांना उपलब्ध होण्यासाठी सामंजस्य कराराचे नूतनीकरण करून प्रकाशन कार्याला गती देण्यात यावी. तसेच कराराच्या अटीतील पालन करण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी समितीचे अध्यक्ष व उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना करण्यात आली आहे.

प्रकाश बन्सोड, अध्यक्ष, भारतीय दलित पँथर.

चार खंड तयार आहेत. त्यांचे १४ एप्रिल २०२२ ला प्रकाशन होणार होते. परंतु काही तांत्रिक अडचणी मुळे होऊ शकले नाही. शिवाय आणखी दोन नवीन खंडांचे काम अंतिम टप्प्यात आहे. विद्यापीठाशी कराराची मुदत संपली तरी काम पूर्ण केले जाईल.

डॉ. प्रदीप आगलावे, सदस्य सचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती.