नागपूर: केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह नागपूर दौऱ्यावर आले होते. शाह यांच्या उपस्थितीत सोमवारी नागपुरात महत्त्वाचे भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आले होते. नॅशनल कॅन्सर हॉस्पिटल येथील ‘स्वस्ति निवास’ या निवासी इमारतीचे भूमिपूजन तसेच, चिचोली येथे नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. या दोन्ही कार्यक्रमांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर अमित शहा नागपूरच्या कार्यक्रमात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष होते. तसेच सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तीन महिन्यांनी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे शहांचे भाषण यादृष्टीने महत्त्वाचे मानले जात होते. मात्र, या दोन्ही कार्यक्रमांपैकी एकाच कार्यक्रमात त्यांनी भाषण केले. नागपूरमधील दोन्ही कार्यक्रमांना अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका गाडीतून प्रवास केला.

रविवारी रात्री नऊ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर येथे आगमन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव इकबाल सिंह चहल, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलिस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल आणि विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर अभिजीत चौधरी, आ.आशिष देशमुख, आ.चरणसिंग ठाकूर, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. त्यानंतर भाजप शहरच्या वतीने अमित शाह यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या सोहळ्याला शहरातील संपूर्ण भाजपचे नेते उपस्थित होते आहे. विशेष म्हणजे अमित शहा यांचा रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये मुक्काम होता.