अकोला : ज्या राज्यात आपली नियुक्ती झाली, त्या राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतरांची सविस्तर माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी घेणे अपेक्षित आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करावी. एका आयपीएस अधिकाऱ्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री कोण, हे कळत नसेल तर ते त्यांच्या शिक्षणाचे दुर्दैव म्हणावे का?, पुजा खेडकरांप्रमाणे अंजना कृष्णांची नियुक्ती सुद्धा बनावट कागदपत्रांद्वारे झाली आहे का? असा संशय राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त करून त्यांच्या चौकशीची मागणी केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सुद्धा संबंधित महिला अधिकाऱ्यांनी बदनामी केल्याचा आरोपही त्यांनी केला. सोलापूर कुर्डू गावातील मुरुम उपसा करताना महिला पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांनी कारवाई केल्यानंतर येथील एका कार्यकर्त्याने थेट अजित पवारांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. अजित पवार व संबंधित महिला अधिकाऱ्यांच्या संवादाची एक चित्रफित समाजमाध्यमातून प्रचंड प्रसारित झाली. त्या चित्रफितीतील संभाषणावरून राज्यात वाद निर्माण झाला.
या प्रकरणात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवारांची पाठराखण करीत संबंधित महिला अधिकाऱ्यांवर टीका केली. ते म्हणाले, ‘महिला पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांची वागणूक अयोग्य आहे. त्यांनी मुख्यमंत्री अजित पवार यांची बदनामी केली. आयपीएस अधिकाऱ्यांना नियुक्त झालेल्या राज्यातील उपमुख्यमंत्र्यांची माहिती नसेल तर त्यांच्या शिक्षणावर संशय येत आहे. पूजा खेडकरांच्या धर्तीवर केंद्रीय लोकसेवा आयोगाने त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करावी, यासाठी आयोगाला पत्र पाठवले आहे. चौकशी करून तत्काळ निलंबित करावे. नियुक्तीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असू शकतो. संविधानानुसार सर्वांना समान अधिकार आहेत. त्या महिला अधिकाऱ्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा अवमान केला त्याचे काय?.’ असा प्रश्न देखील मिटकरी यांनी उपस्थित केला.
राज्यातील शेतकरी गुंड आहेत का? काँग्रेसने उत्तर द्यावे
शेतकऱ्यांना गुंड ठरविण्याचे काम करणाऱ्या व मग्रूर अधिकाऱ्यांची पाठराखण करीत महिला अधिकाऱ्यांचा अपमान केला म्हणून आरोळी ठोकणाऱ्या यशोमती ठाकूर असो, तथाकथित समाजसेविका असो, वा मशालीचा ‘दादा हो’ वाजणारा भोंगा असो, स्त्रीत्वाचा आव आणत सुडबुद्धीने वागत असेल तर याला करंटेपणा म्हणतात, अशी टीका देखील अमोल मिटकरी यांनी केली. राज्यातील शेतकरी गुंड आहेत का? काँग्रेसने याचे उत्तर द्यावे, असे ते म्हणाले.