“प्रकाश आंबेडकरांचा बोलविता धनी कोण?” शरद पवारांवरील विधानावरून अमोल मिटकरी आक्रमक; म्हणाले, “बाळासाहेबांचा स्वभाव…”

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद आजही भाजपाबरोबर आहेत, असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं.

amol mitkari on prakash ambedkar
लोकसत्ता ग्राफीक्स टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजही भाजपाबरोबर आहेत, असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांची भूमिका नेहमीच भाजपाला मदत करणारी राहिली असल्याचे म्हटलं आहे, तर जितेंद्र आव्हाड यांनी सत्तेसाठी वाट्टेल ते बोललेलं खपवून घेणार नाही, असा इशारा दिला आहे. दरम्यान, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही आंबेडकर यांना लक्ष्य करत त्यांचा बोलविता धनी कोण? असा प्रश्न विचारला आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – देवेंद्र फडणवीस – अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी ही राजकीय खेळी असू शकते; जयंत पाटील म्हणाले, “राष्ट्रपती राजवट उठविण्यासाठी…”

काय म्हणाले अमोल मिटकरी?

“बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी प्रकाश आंबेडकर जे बोलले, ते सर्व महाराष्ट्राने बघितलं. शरद पवार आणि आमचं जुनं भांडण आहे. हे आमचं शेतीच्या बांधांचं भांडण नाही. त्यामुळे युतीत त्यांनीही यावं, असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केले असतील, तर त्यांना अशा प्रकारे बोलायला कोणी भाग पाडलं? कारण प्रकाश आंबेडकर अशा प्रकारे बोलू शकत नाही, हे त्यांच्या सोमवारी केलेल्या विधानावरून दिसते. मात्र, दोन दिवसांनंतर ते असं बोलले असतील, तर त्यांचा बोलविता धनी कोण? हे शोधलं पाहिजे”, अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली.

हेही वाचा – “शरद पवारांबद्दल आदर ठेवून बोललं पाहिजे” संजय राऊतांच्या विधानावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया; म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी…”

“मास्टरमाईंड कोण? हे पुढे आलं पाहिजे”

“वंचित आघाडी महाविकास आघाडीचा भाग झाले आहे. अजित पवारांनीही वंचित महाविकास आघाडीत आल्यास आम्हाला कोणतीही अडचण नाही, असं सांगितलं आहे. आमच्या सर्वच घटक पक्षांनी त्यांचे स्वागत केलं. मात्र, आता त्यांनी जी मुलाखत दिली, दोन दिवसांनंतर दिलेली मुलाखत आहे. मला खात्री आहे, की हे प्रकाश आंबेडकरांचे शब्द नाहीत. त्यामुळे त्यांना सांगणार मास्टरमाईंड कोण? हे पुढे आलं पाहिजे”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – ‘शिवशक्ती-भीमशक्ती’चा प्रयोग बुलढाण्यात यशस्वी होणार?

“प्रकाश आंबेडकर साध्या स्वभावाचे”

दरम्यान, प्रकाश आंबेडकरांना अशा प्रकारे कोणी बोलायला भाग पाडू शकतं का? असं विचारलं असता, अशी शक्यता नाकारता येत नाही, अशी प्रतिक्रिया मिटकरी यांनी दिली.
“बाळासाहेब हे साध्या स्वभावाचे आहेत. एकाद्या व्यक्तीच्या साध्या स्वभावाचा फायदा भाजपा घेऊ शकते. त्यामुळे त्यांना एकप्रकारे हिपनोटाईज केल्या सारखा प्रकार भाजपाकडून झाला असावा, अशी शक्यता नाकारता येत नाही”, असा आरोपही त्यांनी केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 12:36 IST
Next Story
“तुरुंगात टाकणार हे कळायला फडणवीसांना सहा महिने का लागले?” सेनेचे खासदार विनायक राऊत म्हणाले, “नक्कीच घोटाळा किंवा काहीतरी…”
Exit mobile version