अमरावती : अर्बन नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी जनसुरक्षा कायदा आणल्याचा सरकारचा दावा अत्यंत हास्यास्पद आहे. हा कायदा आतून बाहेरून काळा असून सामान्यांची गळचेपी करणारा आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासूनच त्याला विरोध आहे. सभागृहात सत्ताधारी पक्षाकडे बहुमत असल्याने त्यांनी बहुमताच्या जोरावर रेटून नेत कायदा मंजूर करून घेतला आहे, असा आरोप करीत काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या कायद्याच्या विरोधात गुरूवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनाद्वारे जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची मागणी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
जनसुरक्षा कायदा देशांतर्गत सुरक्षेच्या नावाखाली सामान्य नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणू शकतो. यामुळे या कायद्याला तीव्र विरोध दर्शवत, त्याची अंमलबजावणी थांबवावी आणि कायदा रद्द करावा, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
जनसुरक्षा कायद्यामागचा हेतूच मुळात काळा आहे. या कायद्याचा फायदा फक्त सरकार व सरकार धार्जिणे उद्योगपती यानांच होणार आहे. सरकारचे फक्त कौतुक करा नाहीतर गप्प बसा आणि विरोधात बोलाल तर जनसुरक्षा कायद्याचा बडगा उभारून तुम्हाला गप्प करू हाच यामागचा हेतू आहे, असा आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला.
यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत या कायद्याला विरोध दर्शवला. यावेळी खासदार बळवंत वानखडे, माजी पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर,माजी पालकमंत्री डॉ.सुनील देशमुख, शहर अध्यक्ष बबलु शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, माजी महापौर मिलिंद चिमोटे, प्रदेश प्रवक्ते दिलीप एडतकर, महिला काँग्रेस अध्यक्ष जयश्री वानखडे, माजी स्थायी समिती सभापती बाळासाहेब भुयार, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नीलेश गुहे, युवक काँग्रेस अमरावती विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख, माजी नगरसेवक मुन्ना राठोड, उपाध्यक्ष संजय वाघ, महासचिव विनोद मोदी, माजी महापौर अशोक डोंगरे, माजी महापौर वंदना कंगाले, कीर्तीमाला चौधरी, वंदना थोरात, अनिला काझी, शिल्पा राऊत, अस्मा परवीन कलाम ठेकेदार, भारती क्षीरसागर, नेहा बागडे, सलीम बेग, प्रदीप हिवसे, विजय वानखडे, सुनील जावरे, गजानन जाधव, फिरोज शाह, समीर जवंजाळ, डॉ.मतीन अहमद, राजीव भेले, गजानन राजगुरे, डॉ.संजय शिरभाते, गजानन रडके, डॉ. आबीद हुसैन, शेख अफजल चौधरी, अनिल माधोगढीया, सतीश मेटांगे, रमेश राजोटे, अभिनंदन पेंढारी, किरण साऊरकर, विकास धोटे, आदी उपस्थित होते.