अमरावती : नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत अंजनगाव सुर्जी येथील एका तरूणाची ऑनलाईन पद्धतीने फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला अमरावती ग्रामीण सायबर पोलिसांनी गुजरात आणि राजस्थानमधून अटक केली आहे. या प्रकरणात चार आरोपींकडून रोख, मोबाईल आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे तक्रारीनंतर अवघ्या एकवीस दिवसांत पोलिसांनी या सायबर लुटारूंना हुडकून काढले आहे.

अंजनगाव सुर्जी येथील एका तरुणाला महिनाभरापूर्वी टास्क प्रकारामध्ये ३ लाख ५६ हजार रुपयांनी फसवण्यात आले होते. या प्रकरणात ग्रामीण दलाच्या सायबर पोलिसांनी चार गुन्हेगारांना राजस्थान व गुजरातमधून पकडले आहे. मागील चार महिन्यात या चारही आरोपींच्या विविध बँक खात्यावर दीड कोटी रुपयांचे व्यवहार झाले असून, या टोळीचे लागेबांधे देशाबाहेर असल्याचेही पोलिसांच्या तपासात समोर येत आहेत.

अंकित भगवंत बोरिया (२७, रा. उद्योगनगर, जि. जामनगर), दर्शन बलवंथाई रावल (३४, रा. रणजित सागर रोड, जि. जामनगर, गुजरात), गुरविनसिंग मनमोहनसिंग खोकर (२३, रा. सुभाष चौक, रातनवाडा, जि. जोधपुर) आणि भावेश इंद्रा गिरी (२१, रा. हिंदुस्थान गवारगेमजवळ, जि. जोधपूर, राजस्थान) यांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात या चौघांव्यतिरीक्त अन्य आरोपी असून पोलिस त्यांचाही शोध घेत आहेत.

या प्रकरणातील हे मुख्य आरोपी नसून यांच्यामागे मोठी टोळी आहे. त्या टोळीचा सूत्रधार देशाबाहेर असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी या चौघांना अटक केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यांबाबत माहिती घेतली असता त्यांनी एप्रिल ते जुलै २०२५ या चार महिन्यात २० खात्यांद्वारे दीड कोटी रुपयांची रक्कम एकीकडून दुसरीकडे, दुसरीकडून तिसरीकडे अशा पद्धतीने फिरवली आहे. ही संपूर्ण रक्कम फसवेगिरीतील असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

या चौकडीकडून ४६०० डॉलर (भारतीय मूल्यानुसार ४ लाख रुपये) डिजिटल मनी असलेली हार्डडिस्क जप्त केली आहे. त्यांच्या व्यवहाराची पद्धत आणि विदेशी डिजिटल मनीवरून त्यांचे व्यवहार विदेशातील गुन्हेगारांसोबत जुळल्याच्या निष्कर्षाप्रत पोलीस आले आहेत.

या प्रकरणात अंजनगाव सुर्जी येथे राहणाऱ्या एका तरूणासोबत टेलिग्राम या समाज माध्यमावर एका अनोळखी व्यक्तीने संपर्क साधला आणि ऑनलाईन पद्धतीने काम करण्याची नोकरी मिळवून देतो, असे आमिष दाखवले. त्यासाठी एक ‘टास्क’ देण्यात आला. तो पूर्ण केल्यानंतर या तरूणाला ९७० रुपयांचा नफा मिळाला. अशाच प्रकारे नफा मिळवून देणारे टास्क आम्ही देऊ, असे सांगून तरूणाकडून ३.५६ लाख रुपये उकळण्यात आले.