एका सोळा वर्षीय मुलाने त्याच्या वडिलांच्या शिकवणी वर्गातील संगणक, प्रिंटरचा वापर करून पाचशेच्या बनावट नोटा छापल्या. विशेष म्हणजे, या बनावट नोटा त्याने चलनातसुद्धा आणल्या. मात्र, याबाबतची माहिती मिळताच परतवाडा पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत तीन बनावट नोटांसह संगणक, प्रिंटर व अन्य साहित्य जप्त केले.

परतवाडा शहरातील एका किराणा दुकानात सदर मुलाने पाचशे रुपयांची नोट देत ४५ रुपयांचे चॉकलेट खरेदी केले. दुकानदाराला मुलाने दिलेल्या पाचशेच्या नोटेबाबत संशय आल्याने त्यांनी त्याला विचारणा केली असता, त्याने ही नोट ‘एटीएम’मधून काढल्याची माहिती दिली. दुकानदाराने या अल्पवयीनाला आधार कार्ड मागितले असता त्याने काढून दिले. त्यावर त्याचे नाव व पत्ता नमूद होता. मात्र, आधार कार्ड काढताना त्याच्या खिशातून एकाच नंबरच्या आणखी दोन पाचशे रुपयांच्या नोटा मिळून आल्या. बिंग फुटत असल्याने मुलाने पळ काढला. याबाबत किराणा दुकानदाराने पोलिसांना माहिती दिली आणि तीनही बनावट नोटा सोपविल्या.

पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत मुलाच्या आधार कार्डावर असलेल्या पत्त्याच्या अनुषंगाने शोध घेतला. दरम्यान, या मुलाचे वडील शिकवणी वर्ग घेत असून पोलिसांनी शिकवणी वर्गाची झडती घेतली असता तेथे बनावट नोटा छापण्याचे साहित्य आढळून आले. बनावट नोटेवर खऱ्या नोटांप्रमाणे अक्षर, चित्र स्कॅन व्हायचे मात्र खऱ्या नोटेवर असलेले महात्मा गांधी यांचे वॉटरमार्क बनावट नोटेवर नव्हते. पोलिसांनी बनावट नोटा छापण्यासाठी वापरलेले संगणक, कलर प्रिंटर, स्कॅनर, लेझर प्रिंटर व इतर साहित्‍य मिळून ३३ हजार १७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बनावट नोटा कशा तयार केल्या याबाबत त्याने पोलिसांना घटनास्थळी प्रात्‍यक्षिकही करून दाखवले. बनावट नोटा छापून त्या चलनात आणणाऱ्या अल्पवयीन मुलावर कारवाई करण्‍यात आली असून तो हे काम कधीपासून करीत होता, यात आणखी कुणाचा समावेश आहे का? या दृष्टीने तपास सुरू असल्‍याचे पोलिसांनी सांगितले.