अमरावती : अमरावती लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीवरून वेगळाच घोळ समोर आला आहे. रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी गेल्या २ एप्रिलला उमेदवारी अर्ज भरला. त्यांना वंचित बहुजन आघाडीकडून पाठिंबा अपेक्षित होता. तो न मिळाल्याचे पाहून त्यांनी उमेदवारी मागे घेण्याची आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची घोषणा केली. पण, आज दुपारी वंचित बहुजन आघाडीने उमेदवार रिंगणात न उतरविण्याचा निर्णय घेऊन आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केला. दरम्यान, सायंकाळी आनंदराज आंबेडकर यांनी पत्र लिहून आपण निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
नामांकन दाखल करण्याच्या दिवशी आपल्या महाराष्ट्र प्रदेश पदाधिकाऱ्यांनी अमरावतीमधील स्थानिक वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना माझ्या रॅलीमध्ये कोणीही सहभागी होऊ नका, अशी फोनद्वारे सूचनावजा ताकीद देण्यात आली होती, असा आरोप आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे. संघप्रणित भाजप सरकारने संविधान बदलविण्याचा जो निश्चय केला आहे, त्याला संविधानिक प्रत्युत्तर म्हणून आपण अमरावती मतदार संघातून आपली उमेदवारी निश्चित केली होती. आमच्या व्यतिरिक्त इतर अनेकांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा जाहीर देखील केला. पण, आपल्याला दिला नाही, अशी खंत आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केली होती.
दरम्यान, आपण अर्ज मागे घेऊ नये आणि उमेदवारी कायम ठेवावी, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी आनंदराज आंबेडकर यांनी केली होती. त्यावर रेखा ठाकूर यांना पत्र पाठवून उमेदवारी मागे घेण्याच्यार निर्णयात बदल होणार नाही, असे आनंदराज आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.