अमरावती : प्रेम प्रकरणातून गुन्हेगारीच्या अनेक घटना घडत असतानाच अमरावती जिल्ह्यातील शिरजगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील अशीच एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. काल ब्राम्हणवाडा ते शिरजगाव मार्गावरील बगाडी नाल्यात एका अज्ञात महिलेचा कुजलेला मृतदेह आढळून आला होता. याची माहिती मिळताच पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळी पोहचून पाहणी केली. महिलेच्या हातावर दुर्गा व अनिल असे नावे गोंदलेले तसेच हातपाय बांधून ब्लँकेटमध्ये गुंडाळून ठेवल्याचे दिसून आले. या महिलेची अज्ञात व्यक्तीने हत्या केली असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले.
मृतदेह कुजलेला असल्याने महिलेची ओळख पटविणे अत्यंत जिकरीचे होते. मृत महिलेच्या हातावर गोंदलेले नावे तसेच कपडे यांची छायाचित्रे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील विविध समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात आले. त्याचा फायदा झाला. परतवाडा येथील एका स्थानिक पत्रकाराने मृत महिला ही परतवाडा जवळील गळंकी येथे राहणारी असल्याची शक्यता आहे, असे सांगितले. नंतर मृत महिलेच्या भावाने छायाचित्र पाहून ती त्याची बहीण दुर्गा विशाल श्रोती (वय २७ वर्ष) ही असल्याचे स्पष्ट केले. ती मागील ७ ते ८ दिवसांपासून घरी आली नसल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर परिसरात अधिक चौकशी केली असता दुर्गा हिचे गावातीलच अनिल जांभेकर (३५, रा. गळंकी, ता. अचलपूर) नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचे समजले. त्यानंतर पथकाने अनिल जांभेकर याला ताब्यात घेऊन विचारपूस केली, प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु त्याला विश्वासात घेऊन अधिक चौकशी केल्यानंतर त्याने दुर्गा सोबतच्या प्रेमसंबंधाची माहिती दिली. दुर्गा ही त्याला खर्चासाठी वारंवार पैशाची मागणी करीत होती. त्यावरून त्यांचे नेहमी भांडण व्हायचे.
५ जुलै रोजी अशाच भांडणातून रागाच्या भरात आपण तिचा गळा आवळला आणि तिची हत्या केल्यानंतर हातपाय बांधून मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळला. रात्रीच्या अंधारात मोटर सायकलवर बांधून शिरजगाव ते ब्राम्हणवाडा रोडवरील नाल्यात फेकून दिल्याची कबुली आरोपीने दिली.
आरोपीने दिलेल्या कबुलीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन शिरजगाव कसबा पोलिसांच्या ताब्यात दिले. सदर प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास सुरु आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकजकुमार कुमावत, सहायक पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.