अमरावती : पावसाळ्यात मेळघाटातील दुर्गम भागातील अनेक गावांचा जिल्ह्याशी संपर्क तुटण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत त्या त्या गावांमध्ये आरोग्य यंत्रणा सक्षम असणे गरजेचे आहे. गावांचा संपर्क तुटला तर गावांमध्ये असलेल्या गरोदर माता, कुपोषणाच्या ‘सॅम’ श्रेणीत असलेल्या बालकांच्या आरोग्याची निगा राखण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मात्र, दुर्गम गावात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक पुरेशी यंत्रणा उपलब्ध नसल्याचे वास्तव समोर आले आहे.

मेळघाटात ७ फिरती आरोग्य पथके आहेत. पण, त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली वाहने ही एकाच ठिकाणी थांबून आहेत. या वाहनांचे टायर बदलण्यासाठी देखील आरोग्य विभागाकडे निधी नसल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांवर ताण आहे. टायर बदलून घेण्यासाठी अकोला, मुंबई, पुणे येथील कार्यालयांवर विसंबून रहावे लागते. देखभाल-दुरूस्तीसाठी निधी मिळत नसल्याने या फिरत्या पथकांनी काम कसे करायचे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

मेळघाटातील अनेक भागात अद्यापही रुग्णवाहिका, प्राथमिक आरोग्य केंद्रांची उभारणी आणि पुरेशा प्रमाणात वैद्यकीय अधिकाऱ्यांची आणखी गरज आहे, असे राज्य सरकारला जिल्हा आरोग्य यंत्रणेने कळवले आहे, पण अजूनही पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ आणि साधन सुविधा उपलब्ध होऊ शकल्या नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.

आरोग्य विभागाचा दावा काय?

गेल्या दहा वर्षांच्या आकडेवारीचा अभ्यास करून मेळघाटात ‘मिशन-२८’ राबविण्यात आले. यात भरारी पथकाने मोलाचे योगदान दिले. त्यामुळे २०१३-१४ मध्ये ३३८ असणारा बालमृत्यू दर हा २०२४-२५ मध्ये १५६ वर आला आहे. तर दहा वर्षांपुर्वी असणारा माता मृत्यू दर हा ५ वर आणण्यात आरोग्य यंत्रणेला यश मिळाले आहे. महत्वाचे म्हणजे उपजत मृत्यू १३४ वरून ७९ वर आणण्यात आले आहे, असा दावा आरोग्य विभागाने केला आहे. संस्थात्मक प्रसूतींची टक्केवारी वाढली आहे. नवसंजीवनी योजनेअंतर्गत धारणी तालुक्यात १२ आणि चिखलदरा तालुक्यात १० असे २२ भरारी पथके कार्यान्वित आहेत. मात्र फिरत्या पथकांकडे वाहनेच नसतील, तर कामे कशा पद्धतीने होतील, हा प्रश्न आता विचारला जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फिरत्या पथकांच्या वाहनांना दुरूस्तीसाठी निधी नाही, टायर्ससाठी निधी नाही. टायर बदलविण्यासाठी अकोला, मुंबई, पुणे येथील कार्यालयांवर विसंबून रहावे लागते. विक्रेंद्रीकरण आवश्यक आहे. सर्व काही तिकडेच आहे. केवळ चर्चा करा आणि बैठका करा, हेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हाती आहे. – ॲड. बंड्या साने, खोज संस्था, मेळघाट