अमरावती: अमरावतीहून मुंबईसाठी सुरू झालेल्या प्रवासी विमानसेवेच्या वेळांबाबत प्रवाशांमध्ये असलेली नाराजी अखेर दूर झाली आहे. प्रवाशांच्या मागणीचा विचार करून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) हिवाळी वेळापत्रकात महत्त्वपूर्ण बदल केले असून, येत्या २६ ऑक्टोबरपासून अमरावतीहून मुंबईला जाणारे विमान आता सकाळी ९.१५ वाजता उड्डाण घेणार आहे. तसेच, आठवड्यातून चार दिवस ही सेवा उपलब्ध होणार आहे.
ही विमानसेवा सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार असे एकूण चार दिवस सुरू राहणार आहे.

मुंबईहून अमरावतीकडे (उड्डाण क्रमांक ९/६३३): वेळ: सकाळी ७:०५ वाजता मुंबईहून निघेल आणि सकाळी ८:५० वाजता अमरावतीला पोहोचेल. अमरावतीहून मुंबईकडे (उड्डाण क्रमांक ९ / ६३४): वेळ: सकाळी ९:१५ वाजता अमरावतीहून निघेल आणि सकाळी ११:०० वाजता मुंबईला पोहोचेल.

सध्या अमरावती ते मुंबई अशी अलायन्स एअर कंपनीची विमानसेवा सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी उपलब्ध आहे. मात्र, सध्याच्या वेळापत्रकानुसार मुंबईहून दुपारी ३.२५ वाजता सुटणारे विमान अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर सायंकाळी ५.१० वाजता पोहोचते. त्यानंतर सायंकाळी ५.३५ वाजता ते मुंबईसाठी पुन्हा उड्डाण घेते आणि रात्री ७.२० वाजता मुंबईत पोहोचते. या वेळांमुळे प्रवाशांना दिवसभराची कामे करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याने ही सेवा सोयीची नसल्याची तक्रार होती. यामुळेच मुंबईला जाणारे विमान सकाळच्या वेळी असावे, अशी मागणी अमरावतीकरांकडून होत होती.

व्यापार आणि पर्यटनासाठी मोठी संधी

‘एमएडीसी’ने आता ही मागणी मान्य करत २६ ऑक्टोबर ते २८ मार्च २०२६ या कालावधीसाठी नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. या नव्या वेळापत्रकामुळे व्यवसाय, उद्योग, वैद्यकीय सेवा, शिक्षण आणि पर्यटन या क्षेत्रांतील प्रवाशांसाठी मोठे फायदे अपेक्षित आहेत.

मुंबईतील काम आटोपून त्याच दिवशी रात्रीने रेल्वे प्रवास केल्यास, दुसऱ्या दिवशी सकाळी अमरावतीत परत येणे शक्य होणार आहे. यामुळे २४ तासांत अमरावतीहून मुंबईला जाऊन परत येणे शक्य होणार आहे. तसेच, सकाळी मुंबईतून अमरावतीत येणाऱ्या प्रवाशांनाही ही विमानसेवा सोयीची ठरेल, कारण सकाळी मुंबईहून अमरावतीकडे परतण्यासाठी कमी रेल्वेगाड्या उपलब्ध आहेत.

एमएडीसीच्या उपाध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे म्हणाल्या की, या नवीन वेळापत्रकामुळे अमरावतीकर नागरिकांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण झाली आहे. या नव्या सेवेमुळे हवाई वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होईल आणि अमरावतीचा विकास होण्यास मदत होईल.