अमरावती : दारू, सिगारेटपासून मुलांना दूर ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करणाऱ्या पालकांपुढे आता अमली पदार्थांच्या विळख्यापासून दूर ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. हा विळखा शाळा, महाविद्यालयांपासून सार्वजनिक ठिकाणापर्यंत जोरकसपणे बसत आहे. या व्यसनांचे केवळ शारिरिक नाही तर मानसिक पातळीवर होणारे परिणामही दीर्घकालीन, गंभीर आहेत. या पदार्थांची तस्करी रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
अमली पदार्थांच्या तस्करीत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणे अशा गोष्टी करीत गुन्हेगारीत गुंतणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस जिल्ह्यात वाढत आहे. त्याला आळा घालण्यासाठी आणि संबंधितांना ताळ्यावर आणण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलिसांनी कंबर कसली असून, भविष्यात गुन्हेगारीचा मार्ग चोखाळणाऱ्या आरोपींची ‘कुंडली’ तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
याशिवाय अनेक आरोपींना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांना समज देण्यावरही भर देण्यात येत आहे. गेल्या दहा वर्षांत अंमली पदार्थांच्या तस्करीत सहभाग असणाऱ्यांची एक यादी तयार करण्यात आली. त्यातून जिल्ह्यातील ५७ आरोपींची माहिती समोर आली. या सर्व आरोपींना प्रतिबंधक कारवाईसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. या अवैध व्यवसायापासून दूर राहण्याचे आणि पुन्हा जर अशा व्यवसायात समावेश असल्याचे निदर्शनास आल्यास कठोर कायदेशीर करण्यात येईल, अशी समज ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी यावेळी दिली.
२६ जून हा जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन म्हणून संपूर्ण जगात पाळला जातो व त्यानिमित्ताने अमली पदार्थांचे युवा पिढीवर होणारे दुष्परिणामाबाबत युवा पिढीमध्ये तसेच समाजातील विविध घटकांत जनजागृती करण्याबाबत शासन आणि पोलीस महासंचालक कार्यालयाने निर्देश दिले होते.
त्यानुसार अमरावती जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांकरीता परिसंवाद आणि चर्चासत्राच्या माध्यमातून पोलीस अधिकारी तसेच समाजसेवी संस्थांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांची प्रभात फेरी तसेच युवक, नागरिकांची बाईक रॅली सुध्दा काढण्यात आली. अमली पदार्थाच्या दुष्पपरिणाम केवळ स्वतःच्या शरीरावरच होत नसून त्यामध्ये कुटुंबही उध्वस्त होते व त्यातून समाजाला सुध्दा त्याचे दुष्परिणाम सहन करावे लागतात, त्यामुळे अशा व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले.
सर्व नागरिकांनी विशेषतः तरूण पिढीने अमली पदार्थाच्या व्यसनापासून दूर राहण्याचे तसेच अमली पदार्थाच्या अवैध व्यवसायाबाबत कुठलीही माहिती असल्यास त्वरित पोलिसांना कळविण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी केले आहे.