अमरावती : भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना समाज माध्यमावरून अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरूणाला हुडकून काढण्यात अमरावती पोलिसांना यश आले असून तांत्रिक तपासाच्या आधारे मागोवा घेत गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला छत्तीसगडमधील भिलाई येथून ताब्यात घेतले. आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला सहकार्य करणाऱ्या इतर चार जणांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

शेख इसा शेख मुसा (२८, रा. पथ्रोट, जि. अमरावती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शेख इसा याला पळून जाण्यास मदत करणारा त्याचा भाऊ शेख मुस्ताक शेख मुसा (३२, रा. पथ्रोट), भावसासरा मोहम्मद जाकीर शेख हसन (३७, रा. अंजनगाव सुर्जी), तसेच आरोपीला अंजनगाव येथून मालवाहू वाहनातून भिलाई येथे घेऊन जाणारा एजाज खान अहमद खान (२४, रा. पथ्रोट) आणि जुबेर सुलतान सौदागर (२१, रा. तरोडा रिद्धपूर) यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नवनीत राणा यांना इन्स्टाग्राम खात्यावरून अश्लील शिवीगाळ आणि जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी इसाभाई या खातेधारकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ चे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके तयार केली होती.

या पथकांना अंजनगाव सुर्जी, परतवाडा, नागपूर, तुमसर, तिरोडा, दूर्ग, रायपूर येथे पाठविण्यात आले. सतत दोन दिवस माहिती काढून संकलित करण्यात आली. गोपनीय बातमीदारामार्फत आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांना आरोपीचा ठावठिकाणा सापडला. आरोपी शेख मुसा हा त्याचा जावई जफर खान उर्फ दादू इस्लाम खान (रा. भिलाई) याच्या घरी असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या ठिकाणाहून आरोपीला ताब्यात घेतले.

शेख मुसा याला पळून जाण्यास मदत करणारा अब्‍दूल मलिक शेख हसन (रा. अंजनगाव सुर्जी) आणि आश्रय देणारा जफर खान हे दोघे फरार आहेत.

हिंदू धर्माचा आवाज बुलंद करणार आज रक्षाबंधनाच्या दिवशी मला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. यावरून महाराष्ट्रात महिला सुरक्षित आहेत याचे उत्तर मिळाले आहे. माझा गळा कापण्याची धमकी देण्यात आली, पण मी घाबरणारी नाही. हिंदू धर्माचा आवाज मी बुलंद करीत राहणार आहे. भावाच्या हाताला राखी बांधणारे बहिणीचे हात तेवढेच सक्षम आहेत, हे दिसून आले आहे, अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली आहे.