अमरावती : जिल्ह्यातील अनेक शाळांना घरघर लागली असताना अमरावती महापालिका शाळांच्या पटसंख्येत मात्र वाढ होत असताना दिसत आहे. शिक्षण विभागाने दिलेल्या आकडेवारीत गेल्या वर्षीपेक्षा चालू वर्षात पटसंख्येत ४६२ ने वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. ही पटसंख्या ११ हजार ९६२ वर गेली आहे. महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या गुणात्मक शिक्षण व इतर उपक्रमांमुळे महापालिकेच्या शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत असल्याचे दिसून येत आहे.
एकीकडे शहरातील खासगी अनुदानीत शाळांचे शिक्षक विद्यार्थी मिळावे, यासाठी सतत फिरताना दिसून येत आहेत तर महापालिकेच्या काही शाळांमध्ये जागा शिल्लक नाही. मोफत पूर्व प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था महापालिकेने केल्याने गरीब कुटुंबातील पालकांची त्यांच्या पाल्यांच्या पूर्व प्राथमिक शिक्षणावर खर्चाची बचत होत असल्याने पालकांचा ओढा महापालिका शाळांकडे वाढत आहे. या वर्षीची महापालिका शाळांची एकूण पटसख्ंया ११ हजार ९६२ एवढी असून मागील वर्षीची पटसंख्या ११ हजार ५०० एवढी होती.
यंदा महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या ४६२ ने वाढली आहे. यात उर्दू शाळांसह गरीब रहिवाशांची संख्या जास्त असलेल्या परिसराचा प्रामुख्याने समावेश आहे. सद्यस्थितीत २ हजार ७३० विद्यार्थी महापालिका शाळांमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणाचा लाभ घेत आहेत. ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढली त्यात उच्च प्राथ. मराठी शाळा क्र.१४, वडाळी, उच्च प्राथ. मराठी शाळा क्र. १७, विलास नगर, उच्च प्राथ. हिंदी शाळा क्र.७, विलास नगर, उच्च प्राथ. हिंदी शाळा क्र.११, भाजी बाजार, हिंदी प्राथमिक शाळा क्र.१२, नागपुरी गेट, उर्दू शाळा क्र.७, मुजफ्फरपुरा, उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्र.८, जमील कॉलनी, उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्र.९, नूर नगर, उर्दू उच्च प्राथ. शाळा क्र.१०, बडनेरा, उर्दू उच्च प्राथ. शाळा क्र.१२, लालखडी, उर्दू प्राथ. कन्या शाळा क्र.३, बडनेरा, उर्दू उच्च प्राथ. शाळा आयएमएस, मराठी उच्च प्राथ. शाळा बेनोडा, हिंदी मुलींची माध्यमिक शाळा, नागपुरीगेट, हिंदी मुलांची माध्यमिक शाळा, तालाबपुरा, मराठी माध्यमिक मुलांची शाळा वडरपुरा या शाळांमध्ये ‘हाऊसफुल’चे फलक लावण्याची वेळ मुख्याध्यापकांवर आली आहे.
महापालिकेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणासह दर्जेदार शिक्षणाच्या सुविधा दिल्या आहेत. तसेच शाळांची स्थिती आधीच्या तुलनेत सुधारण्यात आली असून महापालिका आयुक्तांनी शाळांची दुरुस्ती, सुधारणेकडे लक्ष दिल्याने शाळांमध्ये पटसंख्या वाढत आहे. -डॉ. प्रकाश मेश्राम, शिक्षणाधिकारी, अमरावती महापालिका.