अमरावती : येथील राजकमल चौक रेल्वे उड्डाणपूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यानंतर त्यावर सर्वच स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनीही शासन-प्रशासनावर परखड शब्दात टीका केली आहे. उड्डाणूल पाडायचाच होता, तर आधी पुलाच्या सौंदर्यीकरणावर अडीच कोटी रुपये खर्च केले?, असा सवाल डॉ. देशमुख यांनी केला.
शहरातील पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा महत्वाचा पूल आहे. वाहतूक बंद झाल्याने नागरिक त्रस्त आहेत. निर्णय प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव आहे. ‘हम करे सो कायदा’ अशी अवस्था असल्याचा आरोप डॉ. देशमुख यांनी केला आहे.
या पुलाला नेमके काय झाले, याविषयी शहरातील बहुसंख्य लोक अनभिज्ञ आहेत. अचानकपणे उड्डाणपुलावरील वाहतूक बंद होते, याला काय कारण आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले गेले होते का, हा प्रश्न आहे. आता हा पूल पूर्णपणे तोडून नवीन बांधला जाणार आहे, की केवळ रेल्वे रुळावरील पुलाचा सांधा बदलला जाणार आहे, याविषयी सर्वसामान्य लोक सोडा, लोकप्रतिनिधींनाही काहीच माहिती नाही. एवढ्या महत्वाच्या प्रश्नावर प्रशासन किती निर्बुध्दपणे काम करते, हेच यातून दिसून आले आहे. ही अमरावतीकरांसाठी मोठी शोकांतिका असल्याचे डॉ. सुनील देशमुख यांचे म्हणणे आहे.
पुलाची नियमित आणि योग्य देखभाल केल्यास पुलाचे आयुष्य हे शंभर वर्षांपर्यंत वाढवता येते. वेळोवळी तांत्रिक माहिती घेऊन दुरूस्ती केली असती, तर एवढ्या लवकर पुलाला पाडण्याची गरज भासली नसती. वेळेवर संरचनात्मक लेखापरीक्षण करून घेतले असते आणि उपाययोजना केल्या असत्या, तर ही वेळ आली नसती, असे डॉ. सुनील देशमुख यांनी सांगितले.
हा पूल नादुरूस्त आहे, असे ठाऊक असूनही या पुलाच्या सौंदर्यीकरणाच्या कामासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी आमदारांनी खर्च केल्याचे सांगितले जात आहे. हा खर्च का केला, त्यातून टक्केवारी घेतली गेली का, अशा अनेक गोष्टी समोर येतील, असेही डॉ. देशमुख म्हणाले.
राजकमल चौकातील हा पूल नादुरूस्त असल्याचे भाजपच्या खासदाराला दोन वर्षांपुर्वीच माहिती होते, असे सांगण्यात येत आहे. मग, दोन वर्षांपासून पाठपुरावा का करण्यात आला नाही, असा सवाल डॉ. सुनील देशमुख यांनी राज्यसभेचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांचे नाव न घेता केला. त्यांनी यासंदर्भात पत्रव्यवहार केल्याचा दावा करण्यात येत असला, तरी त्यातून काय साध्य झाले, हा प्रश्न निर्माण होतो, असे ते म्हणाले.