अमरावती : अभिनेते रणदीप हुड्डा यांनी अमरावतीत भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवाला खास भेट दिली. यावेळी माजी खासदार नवनीत राणा आणि रणदीप हुड्डा यांनी गळ्यात भगवा शेला घालून नृत्य सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. येथील नवाथे चौक परिसरात रविवारी सायंकाळी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार रवी राणा, केवलराम काळे, प्रवीण तायडे, माजी खासदार नवनीत राणा यांच्यासह भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी रणदीप हुड्डा यांनी अमरावतीत येऊन खूप आनंद झाल्याचे सांगितले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘ने मजसी ने परत मातृभूमीला..’ या कवितेच्या ओळी सादर केल्या.
रणदीप हुड्डा यांच्या आगमनाची बातमी कळताच त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. रणदीप हे व्यासपीठावर येताच एकच जल्लोष झाला. नवनीत राणा आणि रवी राणा यांनी आपल्याला या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले, मी त्यांचा आभारी आहे. मी स्वत:ला भाग्यवान मानतो, असे रणदीप हुड्डा यांनी सांगितले. रणदीप यांनी ‘जाट’ या चित्रपटात राणा तुंगा ही भूमिका साकारली होती. या चित्रपटातील “मुझे मेरा नाम बहोत पसंत है, राणा तुंगा..” हा डॉयलॉग म्हणत उपस्थितांशी थेट कनेक्ट साधला. दाक्षिणात्य अभिनेते अल्लू अर्जून यांच्या चेहऱ्याशी साधर्म्य असलेले वर्धा येथील अजय मोहिते यांनी देखील ‘पुष्पा’ या चित्रपटातील संवाद सादर केले.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही दहीहंडी स्पर्धा ‘ऑपरेशन सिंदूर’ला समर्पित असल्याचे ऐकून अभिमान वाटल्याचे सांगितले. बावनकुळे म्हणाले, अमरावती शहराचा झपाट्याने विकास होत आहे. येथील विमानतळावरून मुंबईसाठी विमानसेवा सुरू झाली. येत्या काळात देशातील अनेक महत्वाच्या शहरांशी अमरावती जोडले जाणार आहे. पुणे येथे ये-जा करण्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आली, त्याचा फायदा अमरावतीकरांना होणार आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या पुढाकारातून शहरानजीक हनुमान गढी येथे १११ फूट उंचीची श्री हनुमान मूर्ती उभारण्यात आली आहे. या परिसरातील राम वाटिकेत ५ कोटी रुपये खर्चून ‘टॉय ट्रेन’ सुरू केली जाणार आहे. गेल्या काही दिवसांत अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतजमिनीचे, पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सर्वांचे पंचनामे करून तत्काळ नुकसानभरपाई देण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.