Amravati Vijyadashmi Event Controversy RSS / नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अमरावती महानगरच्या वतीने ५ ऑक्टोबरला विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला माजी राज्यपाल दिवंगत रा.सू. गवई यांच्या पत्नी आणि सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई कमलताई गवई यांना निमंत्रण देण्यात आले आहे.
कार्यक्रम पत्रिकेवर त्यांचे नाव असून त्या अमरावतीमध्ये सर्वत्र वाटप झाल्या आहे. मात्र, यानंतर कमलताईंनी संघाच्या कार्यक्रमाला येण्यास कधीच होकार दिलेला नाही, हे संघाचे षडयंत्र आहे, आपण पक्के आंबेडकरवादी आहोत, असे स्पष्टीकरण दिल्याचे पत्र समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. मात्र, खुद्द रा. सू. गवई रिपब्लिकन पक्षाचे नेते असताना १९८१ मध्ये संघ शिक्षा वर्गाच्या समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यावेळचे छायाचित्रही लोकसत्ताकडे उपलब्ध आहे. यामुळे कमलताईंच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याच्या निमंत्रण पत्रिकेला दुजोरा मिळाला आहे.
विजयादशमीच्याच दिवशी १९२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती. यंदा संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असल्याने संघाचा शताब्दी वर्षातील हा ऐतिहासिक विजयादशमी सोहळा राहणार आहे. तर दुसरीकडे दीक्षाभूमी हे नागपूरचे वैशिष्ट्य आहे. १४ ऑक्टोबर १९५६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच दीक्षाभूमीच्या ठिकाणावरून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. हा विजयादशमीचा दिवस होता. त्यामुळे नागपूरमध्ये विजयादशमीच्या दिवशी दीक्षाभूमी आणि संघभूमी अशा दोन ठिकाणी प्रमुख कार्यक्रम असतात. यंदा संघाच्या शताब्दी वर्षाचा सोहळा अमरावती येथे पाच ऑक्टोबरला साजरा होणार असून दीक्षाभूमी उभारणीत प्रमुख वाटा असणाऱ्या परिवारातील कमलताई गवई या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याने सर्वत्र चर्चेचा विषय झालेला आहे.
रा. सु. गवई, राजाभाऊ खोब्रागडे यांचीही उपस्थिती
संघाचे तृतीय सरसंघचालक मधुकर दत्तात्रेय देवरस उपाख्य बाळासाहेब देवरस यांनी केवळ सामाजिक समरसतेचा संदेश दिलाच नाही तर त्यासाठी विशेष प्रयत्न केलेत. सरसंघचालक म्हणून कार्यरत असताना त्यांच्याच कार्यकाळात दलित चळवळीचे वरिष्ठ नेते तसेच बिहारचे राज्यपाल दिवंगत रा. सु. गवई (१९८१) आणि दलित नेते राजाभाऊ खोब्रागडे (१९८३) यांनी संघाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शविली होती. याशिवाय, २०१७ मध्ये विजयादशमी उत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून दलित शीख समुदायातील संत निर्मल दास महाराज (जालंधर) यांना आमंत्रित करण्यात आले होते.
संघाने ‘भेट घेऊन कार्यक्रमासाठी आमंत्रित केले’
कमलताईंचे पत्र समोर आल्यावर अमरावतीमधील संघाच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर माहिती दिली. कमलताईंची वेळ घेऊन भेट घेतली. यावेळी चार प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. कमलताईंना शताब्दी वर्ष सोहळ्यासाठी आमंत्रित केले. त्यांनी होकार दिल्यावरच कार्यक्रम पत्रिकेवर नाव छापण्यात आल्याची माहिती दिली. प्रसार माध्यमांवर फिरत असलेले कमलताईंचे पत्र खोटे असल्याचा दावाही त्यांनी केला.