अमरावती : जिल्ह्यात ‘डिजिटल’ शाळांची संख्या वाढत आहे. मात्र बहुसंख्य शाळांमध्ये ‘इंटरनेट’ जोडणी नसल्याने हे उपक्रम किती प्रभावी ठरणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील केवळ १२३ शाळांमध्येच ‘इंटरनेट’ची सुविधा आहे. विशेष म्हणजे, कुठे नेटवर्कचा अभाव, कुठे शिक्षकांची उदासीनता आणि कुठे वीजपुरवठ्याचा प्रश्न आडवा येतो. परिणामी सरकारी शाळांमधील विद्यार्थी ‘डिजिटल’ शिक्षणापासून वंचित राहात असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात एकूण १ हजार ५५७ जिल्हा परिषद शाळा आहेत. यापैकी ‘पीएम श्री’ योजनेअंतर्गत सुमारे ३०० शाळांचा समावेश आहे. मात्र त्यापैकी केवळ ६० शाळांनाच ‘इंटरनेट’ सुविधा प्रत्यक्षात मिळाली आहे. याशिवाय शहरातील महापालिकेच्या ६३ शाळांना ‘वाय-फाय’ व ‘इंटरनेट’ सुविधा देण्यात आली असून, त्यातील २० शाळांमध्ये प्रत्येकी पाच वर्गखोल्या ‘डिजिटल’ करण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये ‘इंटरनेट’ची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे शिक्षकांनाही स्वतःचा भ्रमणध्वनी वापरावा लागतो. अनेक जिल्हा परिषद शाळांत ‘इंटरनेट कनेक्शन’ नाही. त्यामुळे शिक्षकांना स्वतःच्या भ्रमणध्वनीवरून ‘इंटरनेट’ वापरून विद्यार्थ्यांना ‘डिजिटल’ शिक्षण द्यावे लागत आहे. तर खासगी शाळांमध्ये उत्तम सुविधा उपलब्ध असल्याने पालकांचा कल तिकडे अधिक दिसतो.
मेळघाट परिसर अजूनही अंधारात
जिल्ह्यातील मेळघाट परिसर ‘डिजिटल’ संकल्पनेपासून आजही दूर आहे. अनेक गावे वीज व ‘मोबाईल नेटवर्क’विना आहेत. ‘मोबाईल डिजिटल’ म्हणजे भ्रमणध्वनीच्या मदतीने ‘स्क्रीन’वर अभ्यासाशी संबंधित गोष्टी पाहता येणे. शैक्षणिक दर्जामध्ये अजूनही वाढ व्हावी तसेच विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीची ओळख व्हावी यासाठी शिक्षणात सुधारणा करण्यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. यात ज्ञानरचनावाद शिक्षण प्रणाली प्रत्येक शाळेत राबविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र काही शाळांना दुरुस्तीसाठी निधीची गरज आहे. शिक्षकवर्ग तसेच नवीन वर्गखोल्यांची प्रतीक्षा आहे.
ग्रामीण भागात शिक्षणाचे ‘डिजिटलायझेशन’ तातडीने करायला हवे, शाळांना मोफत ‘इंटरनेट’, संगणक आणि ‘स्मार्ट क्लासरूम’ ची सुविधा द्यायला हवी, प्रत्येक विद्यार्थ्याला अभ्यासासाठी मोफत ‘टॅबलेट’ किंवा भ्रमणध्वनी मिळायला हवा, शिक्षकांना ‘डिजिटल’ शिक्षणाचे प्रशिक्षण दिले पाहिजे, अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केल्या आहेत.
आजच्या काळात शिक्षण म्हणजे फक्त वर्गातला पाटीवरचा धडा राहिलेला नाही. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना ही सुविधा मिळत नाही, हा गंभीर प्रश्न आहे. शहरातल्या मुलांकडे ‘स्मार्टफोन’, ‘वाय-फाय’, ‘टॅबलेट’ सहज उपलब्ध आहेत. पण गावातल्या शाळांमध्ये अजूनही ‘नेटवर्क’ नसते, संगणक अपुरे आहेत, आणि शिक्षकांनाही ‘डिजिटल’ साधनांचे प्रशिक्षण नाही, अशी विपरित स्थिती असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.