अमरावती : वेगवेगळ्या प्रकारची प्रलोभने दाखवून किंवा बनावट लिंक पाठवून ऑनलाईन फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. रोजगाराच्या शोधात असलेल्या एका युवकाची पार्टटाईम जॉबच्या नावाखाली १२ लाख २५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. सय्यद आकीब अली सय्यद अख्तर अली (वय २६, रा. काझीपुरा, अंजनगावसुर्जी) असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे.
एका अनोळखी मोबाईल धारकाने पार्टटाईम जॉबसाठी सय्यद आकीब अली याच्या मोबाईलवरील व्हॉट्सअॅपवर संदेश पाठविला होता. व्हॉट्सअॅप व टेलीग्राम अॅपद्वारे त्यांच्यात चर्चा झाली. काही गोपनीय माहिती सय्यद आकीबकडून शेअर झाली. त्यामुळे अनोळखी सीमकार्ड धारकाने सय्यद आकीब याच्या खात्यातून तब्बल १२ लाख २५ हजार रुपये ऑनलाइन लुबाडले. आपली फसवणूक झाल्याची तक्रार युवकाने अचलपूर पोलीस ठाण्यात नोंदविली. पोलिसांनी संबंधित सिमकार्ड धारक आरोपीच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.