अमरावती : घरामध्‍ये सुरक्षित ठेवलेल्‍या सोन्‍या, चांदीच्‍या दागिन्‍यांसह रोख रक्‍कम असा एकूण २.९८ लाख रुपयांचा मुद्देमाल पळवल्याची तक्रार येथील एका व्यक्तीने दिली अन् नेमके पोलीस तपासात मुलगाच चोर निघाल्याची माहिती पुढे आली.एका नागरिकाच्या घरातून सोन्याचे दागिने व रोख असा एकूण २ लाख ९८ हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. ही घटना शुक्रवार, २५ एप्रिल रोजी उघडकीस आली होती. या प्रकरणी नागपुरी गेट पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास आरंभला. तपासात मुलानेच जुगार खेळण्यासाठी आपल्या घरी चोरी केल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून चोरलेले ४५ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.

अब्दुल मोईन अब्दुल मतीन (२१) रा. गवळीपुरा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी गवळीपुरा येथील रहिवासी अब्दुल मतीन अब्दुल हमीद (४८) यांनी शुक्रवार, २५ एप्रिल रोजी नागपुरी गेट ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अज्ञात चोरट्याने आपल्या घरात ठेवलेल्या पेटीतून आपले व आपल्या मुलीचे ४५ ग्रॅम सोन्याचे दागिने व १ लाख ५० हजार रुपये रोख असा एकूण २ लाख ९८ हजार रुपयांचा ऐवज चोरल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास आरंभला. तपासात अब्दुल मतीन यांचा मुलगा अब्दुल मोईन याने आपल्याच घरी चोरी केल्याची बाब समोर आली. त्यानुसार पोलिसांनी अब्दुल मोईनला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. त्यावेळी त्याने जुगार खेळण्यासाठी व अन्य मौजमजा करण्यासाठी आपल्याच घरी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार त्याच्याकडून चोरलेले ४५ ग्रॅमचे दागिने जप्त करण्यात आले. मात्र, रोकड त्याने खर्च केल्याने ती हस्तगत झाली नाही. ही कारवाई नागपुरी गेटचे ठाणेदार हनमंत उरूलागोंडावार, पोलीस निरीक्षक जनार्धन साळुंखे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गजानन विधाते, फुलचंद चंदेले, दानिश इकबाल, राहुल रोडे, मोहन तायवाडे यांनी केली. अब्दूल मोईन याला जुगाराचा नाद लागला होता. त्याकडे त्याच्या कुटुंबीयांनी सुरूवातीला लक्ष दिले नाही. पण, जेव्हा अब्दूल मोईनच्या कुटुंबीयांना मोईननेच चोरी केल्याचे कळले, तेव्हा त्यांना धक्काच बसला. आपण मौजमजा करण्यासाठी आणि जुगार खेळण्यासाठीच घरातील दागिने आणि रोख रक्कम चोरल्याचे अब्दूल मोईनने पोलिसांना सांगितले.