अमरावती : संपूर्ण देशभरात उच्च शिक्षण क्षेत्रात कार्यरत संस्थाची बहुप्रतिक्षित राष्ट्रीय मानांकन यादी नुकतीच केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने घोषित केली. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अमरावती येथील श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाने राष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा आपली गुणवत्ता कायम राखली आहे. ‘एनआयआरएफ रँकिंग २०२४’ मध्ये या महाविद्यालयाने देशपातळीवर ९९ वे मानांकन प्राप्त केले होते. २०२५ वर्षाच्या मानांकन यादीत या महाविद्यालयाने ९३ व्या स्थानावर झेप घेतली आहे.

विशेष म्हणजे, महाराष्ट्रातून केवळ तीन महाविद्यालयांना या अव्वल १०० च्या यादीत स्थान मिळाले असून, पुण्याचे फर्ग्युसन आणि मुंबईचे झेवियर्स महाविद्यालयाच्या सोबत श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाने आपला ठसा प्रभावीपणे उमटवला आहे. सलग चार वर्षे ‘एनआयआरएफ रँकिंग’मध्ये प्रगतीचा आलेख उंचावत ठेवणे, ही महाविद्यालयाची ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे.

या प्रक्रियेत राष्ट्रीय स्तरावर शिक्षण, अध्यापन आणि संसाधने; संशोधन आणि व्यावसायिक प्रथा; पदवी परिणाम; प्रसार, पोहोच आणि समावेशकता तसेच प्रतिमा व धारणा या पाच निकषांवर महाविद्यालयांचे मानांकन करण्यात येते. शिक्षण, अध्यापन आणि संसाधने या निकषामध्ये श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाने ६७.५० एवढे गुण प्राप्त केले आहेत.

महाविद्यालयाने प्राप्त केलेला ‘नॅक’चा ३.४२ ‘सीजीपीएसह’ ‘ए प्लस’ दर्जा, कोट्यवधी रुपयांचे विद्यार्थी विकासासाठी प्राप्त विशेष प्रकल्प अनुदान, महाविद्यालयाच्या भौतिक सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी मिळविलेले पीएम-उषा सारखे सन्मानजनक प्रकल्प देखील या महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरला आहे. या यशामध्ये प्राचार्य डॉ. जी. व्ही. कोरपे, डॉ. प्रमोद पडोळे तसेच सदस्य डॉ. गजानन वाघ, डॉ. दिनेश खेडकर, डॉ. पंकज नागपुरे, डॉ. उज्ज्वला जुनघरे, डॉ. संगीता इंगोले, डॉ. मनीष गायकवाड यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे प्रयत्न उल्लेखनीय ठरले आहेत.

श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाने शिक्षण, अध्यापन व संसाधने या शैक्षणिक निकषामध्ये मिळवलेले ६७.५० गुण ही विदर्भाच्या शैक्षणिक सामर्थ्याची जिवंत साक्ष आहे. या यशामुळे संस्थेची शैक्षणिक परंपरा व उत्कृष्टतेचा वारसा अधिक भक्कम झाला आहे. – श्री हर्षवर्धन देशमुख, अध्यक्ष, श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती</strong>

अध्यापन, संसाधने व पदवी परिणाम यामधील उच्च गुणवत्तेच्या जोरावर श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय प्रगतीपथावर आहे. उद्योग, नियोक्ते, संशोधक व माजी विद्यार्थ्यांशी अधिक सशक्त संवाद साधून येत्या काळात ‘परसेप्शन’ मध्ये निश्चितच सुधारणा घडवून आणू. – प्राचार्य डॉ. जी. व्ही. कोरपे, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती.