उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आपल्या भूमिका बेधडकपणे मांडण्यासाठी ओळखल्या जातात. त्यांनी ठाकरे सरकारच्या काळात ठाकरे कुटुंबीयांवर सडकून टीका केली. त्यामुळे अनेकदा वादही झाले. यानंतर शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी त्याला प्रत्युत्तर देत अमृता फडणवीसांना लक्ष केलं. आता पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारच्या आगमनासह अमृता फडणवीस चर्चेत आहेत. यावेळी अमृता फडणवीस यांनी ठाकरे कुटुंबाला एक सल्ला दिला आहे. त्या एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या.

अमृता फडणवीस पुढे म्हणाल्या, “मी त्यांना आता काहीच सांगू इच्छित नाही. मला जे सांगायचं होतं ते मी दोन अडीच वर्षांपूर्वी खूप काही सांगितलं आहे. आता प्रत्येक व्यक्तीविषयी इतकी जनजागृती झाली आहे आहे सांगायला काही उरलं नाही. मी त्यांना फक्त एवढंच सांगेन की ‘सक्षम लोक कायम टिकतात, प्रतिकूल परिस्थिती कायम राहत नाही’.”

“मला जितकी जमेल तेवढी लोकसेवा, समाजसेवा करायची आहे”

“येत्या काळात माझी आधीही जी भूमिका होती तीच असेन. मला घर सांभाळायचं आहे. मला माझं काम सांभाळायचं आहे आणि मला जितकी जमेल तेवढी लोकसेवा, समाजसेवा करायची आहे. लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल आणू शकेन तिथं मी पुढाकार घेऊन करून दाखवेन,” असंही अमृता फडणवीस यांनी नमूद केलं.

“ते कधीकधी चष्मा, हुडी घालून बाहेर पडायचे”

अमृता फडणवीस म्हणाल्या, “देवेंद्र फडणवीस सामान्यपणे खूप उशिरापर्यंत काम करतात. त्यामुळे मला जास्त लक्षात आलं नाही, पण कधीकधी ते चष्मा व हुडी घालून बाहेर पडायचे. ते असे दिसायचे की मलाही ओळखू यायचे नाही. मी त्यांना असं एवढ्यात नवीन काय सुरू आहे असं विचारलं. ते उत्तर देणं टाळायचे. तरी मला काही ना काही चालू आहे असं वाटायचं.”

हेही वाचा : “योगी होण्यासाठी बायकोला सोडावं लागतं, फडणवीस…”, अभिनेत्री दीपाली सय्यद यांचं अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“शिवसेनेतील अस्वस्थता कुठे ना कुठे निघणार होती”

“एकनाथ शिंदे यांचं भाषण सर्वांनी ऐकलं. त्यातून शिवसेनेच्या सर्वच लोकांमध्ये किती अस्वस्थता होती ते लक्षात येतं. विशेषतः आमदार व कार्यकर्त्यांमध्ये ही अस्वस्थता होती. ती कुठे ना कुठे निघणार होती. त्याला जागा देण्याचं काम भाजपाने केलं आहे. त्या आमदारांच्या अडचणीत त्यांच्या मागे उभं रहायचा निर्णय भाजपाने घेतला आणि तो चांगलाच आहे,” असं अमृता फडणवीस यांनी सांगितलं.