सध्या लहान मुले चोरणारी टोळी असल्याच्या अफवांना पेव फुटले आहे. समाज माध्यमांवर चुकीचे संदेश प्रसारित होत असल्यामुळे लहान मुले, महिला, विद्याथी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही जिल्ह्यांत या अफवेला बळी पडलेल्या जमावाने निरापराधांना मारहाण करण्याचे प्रकारही समोर आले आहेत. या अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे. मात्र, या घटना वाढतच चालल्या आहे. यामुळे भीक्षेसाठी गावोगावी फिरणाऱ्या नाथजोगी व भटक्या समाजात अस्वस्थता पसरली आहे.

हेही वाचा- परभणी : सेलू तालुक्यातील चार मुले बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल

संरक्षण देण्याचे भटक्या समाजाची मागणी

मुले चोरणारी टोळी असल्याच्या अफवेतून साधूंवर आणि तृतीयपंथीयावर हल्ल्याच्या घटना राज्यात घडल्या आहेत. नाथजोगी समाज वेषांतर करून गावोगावी भीक्षा मागतात. भटक्या समाजातील बांधवही गावोगावी फिरत असतात. नाथजोगी, आदिवासी भटक्या समाजाच्यावतीने वाशीम येथे मोर्चा काढून, ‘आम्हीही माणसेच आहोत, आम्हाला सरंक्षण द्या’, अशी मागणी करण्यात आली. मेडगी जोशी, नाथजोगी डवरी गोसावी, वासुदेव, चित्रकथी, गोंधळी, बेलदार, घिसाडी, कुरमुड जोशी, पात्रवट, भाठ, मसंनजोगी, बाळा बुगडे वाले गोसावी आणि भटके विमुक्त यांच्यावर होणारे हल्ले थांबवावे आणि सरंक्षण द्यावे, असे नाथजोगी आणि आदिवासी भटक्या समाजाचे म्हणणे आहे.

पोलिसांकडून नागरिकांना आवाहन

दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, अथवा अफवा पसरवू नये. शाळा व महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांनीही काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा- मुले चोरणाऱ्या टोळीची अफवा; समाजमाध्यमांवरील संदेशाने दहशत

१२ वर्षीय मुलाला पळवून नेल्याची चर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाशीम शहरातील काळे फाईल परिसरातील १२ वर्षाचा मुलगा शनिवारी दुपारपासून बेपत्ता होता. कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला असता सायंकाळी तो वांगी फाट्याजवळ आढळून आला. या मुलाला पळवून नेल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. पोलीस मुलाकडून सत्य परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती. यासंदर्भात ठाणेदार शेख यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.