लोकसत्ता टीम

अकोला : प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत नेत्रदिपक संचलन होणार आहे. यामध्ये अकोल्यातील महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्याचा मुलगा आनंद अनिल खोडे व दुसऱ्या सफाई कर्मचाऱ्याचा मुलगा सुमित पथरोड सहभागी होणार आहेत. सुमित हा पंतप्रधान बँड पथकात जिल्ह्याचे नेतृत्व करेल, तर आनंद हा संचलनामध्ये ‘ऑल इंडिया एनसीसी परेडचे कमांडिंग’ म्हणून नेतृत्व करणार आहे. दोघोही श्री शिवाजी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. आनंद हा बीए प्रथम वर्षाचा विद्यार्थी असून वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षीच त्याची ‘परेड कमांडर’ म्हणून निवड झाली. आनंद व सुमित यांच्या निवडीमुळे अकोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथवर भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल, पोलीस आणि निमलष्करी गटांचे जवान नेत्रदिपक संचलन सादर करतात. देशभरातील विविध भागातून निवडक एनसीसी कॅडेट्स सुद्धा या संचलनामध्ये सहभागी होतात. त्यामध्ये यंदा जुने शहरातील डाबकी रोड येथील रहिवाशी आनंद अनिल खोडे हा सुद्धा सहभागी होणार आहे. त्याचे वडील अनिल खोडे हे महापालिकेत सफाई कर्मचारी आहेत. संचलनासाठी निवड व्हावी, यासाठी तो गत एक वर्षापासून नियमित सराव करीत होता. अतिशय मेहनत व परिश्रमानंतर आनंदची निवड झाल्याची माहिती त्याचे वडील अनिल खोडे यांनी दिली. आनंदने आपल्या यशाचे श्रेय महाविद्यालयाचे अध्यक्ष माजी आमदार हर्षवर्धन देशमुख, प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे, कॅप्टन डॉ. आनंदा काळे, लेफ्टनंट डॉ. अश्विनी बलोदे, एनसीसीचे कमांडिग ऑफिसर कर्नल व्ही.एन. शुक्ला यांच्यासह आपल्या कुटुंबियांना दिले आहे.

‘परेड कमांडर’ म्हणून भूमिका बजावणार

महाविद्यालयीन जीवनात राष्ट्रीय छात्र सेनेत सहभागी झाल्यानंतर प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचे सर्व कॅडेट्सला आकर्षण असते. यामध्ये निवड होण्यासाठी कठोर परिश्रम केल्यानंतर आनंदची ‘ऑल इंडिया परेड कमांडर’ म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे दिल्ली येथील संचलनामध्ये निवड झालेल्या देशभरातील एनसीसी कॅडेट्सचे नेतृत्व अकोल्यातील आनंद करणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आर्म वेस्टलिंगमध्येही सुवर्ण पदक

विद्यार्थी जीवनात महाविद्यालयीन शिक्षणासह आनंद याने क्रीडा क्षेत्रातही जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय आर्म वेस्टलिंग स्पर्धेत आनंदने गत वर्षी सुवर्ण पदक प्राप्त केले होते. त्यानंतर आता देशपातळीवर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.