अमरावती : भाजपचे राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे यांना रविवारी सायंकाळी ई-मेलद्वारे एका अज्ञात व्यक्तीने धमकी दिली असून यासंदर्भात राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांनी ई-मेल पाठविणाऱ्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
डॉ. अनिल बोंडे यांचे स्वीय सहायक रविकिरण वाघमारे यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. रविकिरण वाघमारे हे डॉ. बोंडे यांच्या कार्यालयात दैनंदिन काम करीत होते. डॉ. बोंडे यांना येणारे ई-मेल पाहत असताना त्यांना एका अनोळखी आयडीवरून आलेला धमकीचा ई-मेल दिसला. या ई-मेलमध्ये डॉ. बोंडे यांना स्वत:च्या तोंडावर ताबा ठेवावा, अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देण्यात आला आहे.
काही दिवसांपुर्वी ‘विचारा इस्लामविषयी?’ या मजकुराचे फलक शहराच्या मध्यवर्ती भागांमध्ये झळकले होते.
डॉ. अनिल बोंडे यांनी यावर तीव्र आक्षेप घेत, हे धर्मांतरणाचे षडयंत्र असल्याचा आरोप केला होता आणि संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली होती. ‘इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटर’ (आयआयसी) या संस्थेतर्फे हे फलक लावण्यात आले होते. डॉ. बोंडे यांना आलेल्या धमकीमध्ये या फलकांचा उल्लेख आहे. हिंदी भाषेतून हा ई-मेल पाठविण्यात आला आहे.
इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटरविषयी आपण जी भाषा वापरली, त्यामुळे हैदराबाद येथील मुस्लिमांमध्ये रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे वातावरण तापले आहे. तुमच्या वक्तव्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्याचा राग लोकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे. युवक असोत किंवा ज्येष्ठ नागरिक, सर्वांना आपल्या वक्तव्यामुळे वेदना झाल्या आहेत. ही नवशिक्यांची केवळ नाराजी नाही, तर तर हा प्रचंड राग आहे, ही ठिणगी वणव्याचे रुप घेऊ शकते.
आमच्या धार्मिक भावनांशी खेळण्याची हिंमत कुणी करू नये. आपल्या कृतीमुळे उत्पन्न झालेला राग लोक लपवू शकलेले नाहीत. आपण जी आग लावली, त्याचा धूर अधिकच गडद झाला आहे. आपली कृती मुस्लिम समाज हा खुल्या जखमेसारखी मानत आहे. त्यामुळे आपण यापुढे आपण आपल्या तोंडावर ताबा ठेवावा, असे या ई-मेलमध्ये म्हटलेले आहे.
अमरावती शहरातील शाळा-महाविद्यालय असलेल्या हिंदू बहुल भागात हे फलक लावण्यात आले असल्याने अल्पवयीन मुलांमध्ये धर्मांतरणाचा प्रचार करणे हाच या फलकांचा मुख्य अजेंडा आहे, असा थेट आरोप डॉ. अनिल बोंडे यांनी केला होता.
