राज्यात गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार ) आमदार अनिल देशमुख यांच्यात आरोप प्रत्यारोप आणि टीका टीपणी सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांच्या कथित वसुलीप्रकरणी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं होतं. त्यानंतर राज्यात बराच वाद निर्माण झाला होता. हा वाद शांत होत नाही, तोच आता देवेंद्र फडणवीसांच्या दबावामुळे विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याच्या आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर आता विविध राजकीय चर्चांनाही उधाण आलं आहे.

अनिल देशमुख यांनी आज नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याचा आरोप केला. तसेच त्यांनी महाविकास आघाडीचे जागावाटप आणि हरियाणाच्या निकालावरही भाष्य केलं.

हेही वाचा – Anil Deshmukh : “हातात बेड्या असलेला आरोपी पोलिसांचे पिस्तूल कसे हिसकाऊ शकतो?”, अनिल देशमुखांचा सवाल

नेमकं काय म्हणाले अनिल देशमुख?

“देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे पालकमंत्री आहेत. तसेच राज्याचेउपमुख्यमंत्री आहेत. मात्र, त्यांच्या दबावामुळे जिल्हाधिकारी अनेक विकास प्रकल्पांच्या फाईलवर सही करत नाही. विविध योजनांच्या निधीसाठी आम्ही सातत्याने मागणी करतो आहे. पण काटोल-नरखेड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा ( शरद पवार गट ) मतदारसंघ असल्याने राजकारण करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करत आहेत. त्यामुळे आमच्या मतदारसंघातील अनेक विकासकामे प्रलंबित आहेत”, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे.

“…तर आम्ही न्यायालयातही दाद मागू”

“भाजपाच्या आमदाराला जास्त निधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराला कमी निधी असं चालणार नाही. सर्वांना समान निधी मिळाला पाहिजे. जर आम्हाला निधी मिळाला नाही, तर आम्ही हक्कभंगाचा प्रस्ताव आणू तसेच असून याविषयी न्यायालयातही दाद मागू. सामान्यांचा विकास कामांसाठी आमदारांना पैसे मिळालेच पाहिजे. यात कोणताही भेदभाव होता कामा नये”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

जागावाटबाबत बोलताना म्हणाले…

पुढे बोलताना अनिल देशमुखांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपावरही भाष्य केलं. “जागावाटपाबाबत दोन दिवसांपूर्वी बैठक झाली. पण विदर्भातील अनेक जागांचा निर्णय अद्याप बाकी आहे. दसऱ्यानंतर आम्ही बैठक घेऊन याबाबत चर्चा करू. सक्षम उमेदवार बघून या जागांबाबतचा निर्णय घेतला जाईल”, असं त्यांनी सांगितलं. तसेच “महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री कोण होईल, हा निर्णय नेते घेतील. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय १० मिनिटांत घेतला जाईल”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – Badlapur: “सरकारकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न”; अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर विरोधकांची प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“…पण महाराष्ट्रातही तशी स्थिती निर्माण होईल”

दरम्यान, हरियाणातील काँग्रेसच्या पराभवाबाबत विचारलं असता, “हरियाणात इंडिया आघाडीच्या घटक पक्षांना जागा सोडण्यात आली नाही. जर घटकपक्षांसाठी जागा सोडल्या असत्या, तर तिथे निकाल वेगळा लागला असता. पण हरियाणात इंडिया आघाडीला फटका बसला याचा अर्थ महाराष्ट्रातही तशी स्थिती निर्माण होईल, असं नाही. आम्ही मित्रपक्षांशी चर्चा करूनच जागावाटपाचा निर्णय घेऊ”, असे त्यांनी सांगितलं.