नागपूर : केंद्रीय कोळसा मंत्रालयाने नागपुरातील गोंडखैरी ता. कळमेश्वर येथील भूमिगत कोळसा खाण मेसर्स ‘अदाणी पॉवर’ला दिली आहे. या निर्णयाला स्थानिकांचा विरोध असल्याचे सांगत शरद पवारांचे विश्वासू सहकारी व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयाला पत्र दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यावर शरद पवार यांची उद्योगपती गौतम अदाणी यांनी भेट घेतली होती. या घडामोडीच्या काही दिवसानंतरच अनिल देशमुख यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नागपूर कार्यालयाला पत्र देत अदानींच्या नागपूर जिल्ह्यातील गोंडखैरी खाणीला स्थानिकांचा विरोध असल्याचे कळवले आहे. ही खाण ८३२ हेक्टरमध्ये आहे. या खाणीचे क्षेत्र मेट्रोरिजनमध्ये आहे. मेट्रोरिजनचे १०० वर्षांचे नियोजन नागपूर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणकडून करण्यात आले आहे. खाणीच्या क्षेत्रात वेणा जलाशय असून त्याचे पाणी अमरावती रोड व खाण परिसरातील सर्व गावाला पिण्यासाठी दिले जाते. या क्षेत्रात आयुध निर्माणी केंद्र असून ही संस्था केंद्राच्या सरंक्षण विभागाशी संबंधित आहे. या केंद्रातही या जलाशयाचे पाणी वापरले जाते. या खाण परिसरातील सर्व भाग निमशहरी असून दाट वस्तीचा आहे.

हेही वाचा – महामार्गावरील ढाब्यांवर मद्याचे अड्डे; ढाबाचालकांकडून बस चालकांना प्रलोभने, अपघात नियंत्रण कसे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या खाणीसाठी परिसरातील जमीन मोठ्या प्रमाणात अधिग्रहित केली जाईल. त्यामुळे येथील गावांचे व घरांचे पुर्नवसन करावे लागणार असल्याने लोकांना त्याचा त्रास होईल. त्यामुळे येथील नागरिकांचा या खाणीला मोठ्या प्रमाणात विरोध असल्याचेही देशमुखांनी या पत्रात नमूद केले आहे.