देवेश गोंडाणे
नागपूर : मातंग समाजाच्या उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाला गेल्या पाच वर्षांत सरकारकडून एकही रुपयाचा निधी उपलब्ध झाला नाही. परिणामी हे मंडळ बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे.




युती व महाविकास आघाडी सरकारच्याही काळात या महामंडळाला अनुदान, बीजभांडवल आणि एनएफएसडीसी या तिन्ही योजनांसाठी निधीपासून वंचित रहावे लागले. अनुदान योजनेसाठी २०१७-१८ ते २०२१-२२ या पाच वर्षांत एकूण २१ हजार ३१२ अर्ज आले. मात्र, निधीअभावी लाभार्थी फक्त ५०९४ इतके आहेत. बीजभांडवल योजनेसाठी २०१५-१६ ते २०२१-२२ या वर्षांत २० हजार २१ अर्ज आले. लाभार्थी फक्त २७०७ आहेत. राष्टीय अनुसूचित जाती वित्त व विकास (एनएफएसडीसी) योजनेसाठी २०१५-१६ ते २०२१-२२ या वर्षांत ७६ अर्ज आणि तितकेच लाभार्थीही आहेत. या योजना समाजातील तळागाळातपर्यंत किती व कशा पोहचतात?, यासाठी जाहिरात व जनजागृतीचा खर्च व तपशील माहिती अधिकारांतर्गत शासनाकडे मागितला असता, तो उपलब्ध नाही, असे सांगण्यात आले. तसेच महामंडळामध्ये सुरू असलेल्या विविध योजनांच्या लाभार्थीच्या कर्ज परताव्याची माहितीही विभागाकडे नाही. या संपूर्ण बाबी येथील भोंगळ कारभार अधोरेखित करणाऱ्या ठरतात.
नक्की काय झाले?
२०१७-१८ ते २०२१-२२ या काळात शासनाकडून या महामंडळाला कोणताही निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे येथील सर्व योजना ठप्प पडल्या आहेत. योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी जाहिरात, जनजागृतीचा तपशीलही उपलब्ध नाही. त्यामुळे या योजनेचा लाभ कुणाला मिळणार हा प्रश्न आहे.
राजकीय पक्षांचे दुर्लक्ष
या महामंडळाकडे सर्वच राजकीय पक्षांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. माजी समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनी तीन महिन्यांपूर्वी प्रत्येक महामंडळाला एक हजार कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र, सत्तांतर झाल्याने घोषणा बारगळली. नव्या सरकारने ही बाब विचारात घेऊन तातडीने महामंडळ सक्षम बनून समाजापर्यंत विविध योजना पोहोचविण्यासाठी प्रत्यन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
घोषित योजना, उपक्रम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत ही चिंतेची बाब आहे. याचे समाजातील जागृत नागरिकांनी आत्मचिंतन करायला हवे. अन्यथा अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने चालणारे महामंडळ लवकरच बंद पडेल.
– कुलदीप आंबेकर, अध्यक्ष, स्टुडंट हेल्पिंग हँड्स.