तलाठी गावात आल्याची घोषणा मंदिर, मशिदीच्या भोंग्यातून : कृषीमंत्री सत्तार

विम्याच्या जाचक अटीबाबत केंद्र सरकारला प्रस्ताव देऊन दुर करण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले

तलाठी गावात आल्याची घोषणा मंदिर, मशिदीच्या भोंग्यातून : कृषीमंत्री सत्तार
राज्याचे नवे कृषीमंत्री अब्दुल सत्तार

नागपूर : विविध भागात तलाठ्यांसह इतर अधिकारी- कर्मचारी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती व अन्य नुकसानीचे पंचनामे करत आहेत. या तलाठ्यांनी शेतकऱ्यांच्या माहितीसाठी गावात आल्याची घोषणा तेथील मंदिर, मशिदीच्या भोंग्यातून करावी, अशी सूचना राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली.

नागपूर विभागातील अतिवृष्टीचा आढावा घेण्यासाठी येथील विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना सत्तार म्हणाले, नागपूर विभागात जुलैपर्यंतचे पंचनामे पूर्ण झाले. ऑगस्टमधील पंचनामे निम्मे शिल्लक असून ते दोन ते तीन दिवसांत पूर्ण करण्यास सांगितले आहे. राज्यातील एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये म्हणून शासन कटीबद्ध आहे. पंचनाम्याबाबत काही तक्रारी लोकप्रतिनिधींनी केल्या. त्यावर तलाठ्यांना गावात गेल्यावर मंदिर, मशिदीतून तेथे आल्याची घोषणा करण्याच्या सूचना केल्याचे सत्तार म्हणाले. पंचनाम्यासाठी तलाठी शेतापर्यंत जात नसल्याच्या तक्रारीबाबत ते म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांनी ‘व्हाॅट्सएप ग्रुप’ तयार करून त्यावर तलाठ्यांना पंचनामा करतानाचे छायाचित्र काढून त्यावर टाकण्याची सूचनाही करण्यात आली आहे. सोबत झालेल्या पंचनाम्याचे वाचन  ग्रामसभेत करण्याचीही सूचना केली. विम्याच्या जाचक अटीबाबत केंद्र सरकारला प्रस्ताव देऊन दुर करण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचेही मार्गदर्शन घेणार असल्याचेही सत्तार म्हणाले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
धनगर समाजाच्या सक्षमीकरणासाठी २२ योजना, अंमलबजावणीचे आदेश
फोटो गॅलरी