अनेकांना गंडा घालणारा स्वंयघोषित माध्यम विश्लेषक अजित पारसेविरोधात आणखी एका प्रकरणात अंबाझारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पारसेने एका ड्रायव्हिंग स्कूल संचालकाला सामाजिक दायित्व निधीतून ( ‘सीएसआर’ ) रक्कम मिळवून देण्याचे आमिष दाखवून ३५ लाख रुपये रोख घेतले. त्यापैकी १७ लाख रुपये परत केले व उर्वरित १८ लाख रुपयांनी गंडा घातला. यासंदर्भात ड्रायव्हिंग स्कूल संचालक मनीष वझलवार यांनी अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्या आधारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

हेही वाचा >>>नागपूर: ‘नागरी सेवा परीक्षेच्या विनामूल्य प्रशिक्षणासाठी अर्ज करा’, प्रवेश प्रक्रिया सुरू

पारसेची वझलवारसोबत जानेवारी २०१८ मध्ये भेट झाली होती. ड्रायव्हिंग स्कूलशी संबंधित प्रोजेक्ट्स माझ्याजवळ आहेत, त्यासाठी सामाजिक दायित्व निधीतून रक्कम मिळवून देतो असे त्याने सांगितले होते. एक कोटीच्या ‘सीएसआर’ फंडामागे त्याने १० लाख कमिशन द्यावे लागेल असे सांगितले व वझलवार यांना काही फाईल्स दाखविल्या. विविध सरकारी परवानग्या मिळविण्यासाठी बहुउद्देशीय संस्था स्थापन करावी लागेल, असा दावा करत पारसेने वझलवार यांच्याकडे पॉवर ऑफ अटॉर्नी लिहून देण्याची मागणी केली. तसेच साडेआठ कोटींच्या ‘सीएसआर’ फंडासाठी सुमारे ८५ लाख रुपये लागतील, असे त्याने सांगितले. त्याने वझलवार यांना इतर संस्थांना मिळालेल्या परवानगीची पत्रे दाखविल्याने त्यांचा विश्वास बसला व त्यांनी पैसे देण्यास होकार दिला.

हेही वाचा >>>संत्रा उत्पादन वाढीसाठी ‘आयआयएम’ नागपूरचा पुढाकार; राज्यातील ३० हजार उत्पादकांना देणार प्रशिक्षण

पारसेने सर्व प्रस्ताव तयार केले व वझलवार यांच्याकडून त्यांचे तसेच त्यांचे सासरे व पत्नीची कागदपत्रे घेतली. १४ मे २०१८ रोजी पारसे वझलवार यांच्याकडे गेला व त्यांच्याकडून पाच लाख रुपये रोख घेतले. त्यानंतर एम. वझलवार बहुउद्देशीय संस्थेचा ‘सीएसआर’ फंड मंजूर झाल्याचा संदेश त्याने वझलवार यांना पाठविला. त्यानंतर त्याने त्यांच्याकडून आणखी तीस लाख रुपये वेळोवेळी घेतले. वझलवार यांनी विचारणा केली असता त्याने त्यांना ‘सीएसआर’ फंडाचा डिमांड ड्राफ्ट मिळाल्याचे फोटो पाठविले व त्यांना ड्राफ्टदेखील नेवून दाखविला. मात्र, तो ड्राफ्ट त्याने कधीच बहुउद्देशीय संस्थेच्या खात्यात टाकला नाही.

हेही वाचा >>>राज्यातील सुपरस्पेशालिटी रुग्णालयांना तज्ज्ञ डॉक्टर मिळणार कधी?; कोटय़वधींच्या इमारती केवळ शोभेच्या वास्तू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ड्राफ्ट जमा न झाल्याने वझलवार यांनी पारसे याला विचारणा केली असता त्याने मी तुमच्याशी खोटे बोललो. तुमचे पैसे मी दोन महिन्यांत परत करतो, असे आश्वासन दिले. वझलवार यांना त्याने मार्च ते डिसेंबर २०१९ या कालावधीत १७ लाख रुपये परत केले. मात्र, उर्वरित रक्कम परत करण्यास टाळाटाळ केली. पारसेचे फसवणुकीचे प्रकार उघडकीस आल्यावर वझलवार यांना आपली मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात आले.