वाघाचे दात, नखांसह पाच आरोपींना अटक

संयुक्त वनव्यवस्थापन समितीचा अध्यक्षच वाघ शिकार प्रकरणात आढळल्याने वनखात्यात खळबळ उडाली आहे.

आरोपींमध्ये संयुक्त वनव्यवस्थापन समितीचा अध्यक्ष

नागपूर : संयुक्त वनव्यवस्थापन समितीचा अध्यक्षच वाघ शिकार प्रकरणात आढळल्याने वनखात्यात खळबळ उडाली आहे. नागपूर वनविभागाने मंगळवारी केलेल्या कारवाईत वाघाचे दात आणि नखांसह पाच आरोपींना अटक करण्यात आली.

उमरेड बसस्थानकाजवळ मंगळवारी २३ नोव्हेंबरला वाघाच्या दातांची विक्री होणार असल्याची गुप्त माहिती नागपूर वनविभागाला मिळाली. या माहितीच्या आधारावर दक्षिण उमरेड वनपरिक्षेत्राच्या पथकाद्वारे सापळा रचून तीन आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीतून आणखी काही नावे समोर आल्यानंतर मेळघाट सायबर सेलच्या मदतीने आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली. खळकाळा येथील ताराचंद नेवारे, राजू कुळमेथे, वाढोणा येथील दिनेश कुंभले, अजय भानारकर, सोनपूर येथील प्रेमचंद वाघाडे हे सर्व आरोपी चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड तालुक्यातील आहेत. या सर्व आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियमाअंतर्गत वन गुन्हा नोंद करण्यात आला. या सर्व आरोपींना बुधवारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. २३ नोव्हेंबरला मौजा उमरेड येथून दुपारी  आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सहाय्यक वनसंरक्षक एन.जी. चांदेवार यांनी सांगितले. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या अध्यक्षाचा समावेश असल्याने वनखात्यात खळबळ उडाली आहे. ही कारवाई प्रादेशिक नागपूरचे मुख्य वनसंरक्षक पी. कल्याणकुमार व उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख सहाय्यक वनसंरक्षक एन.जी. चांदेवार, वनपरिक्षेत्र अधिकारी कोमल गजरे यांच्यासह वनपाल श्री. चौगुले, अगळे, भिसे तसेच वनरक्षक श्री. कोपले, नरवास, पेंदाम, श्रीरामे, हेडाऊ आणि दक्षिण उमरेड व उत्तर उमरेड वनपरिक्षेत्रातील वनकर्मचारी यांनी  केली. पुढील तपास सहाय्यक वनसंरक्षक एन.जी. चांदेवार करत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Arrested tiger teeth nails ysh

ताज्या बातम्या