कारागीर मात्र उपेक्षित
विजयादशमीला देशभर रावणदहन केले जाते. रावणाचे पुतळे तयार करणारे कारागीर मात्र आजही उपेक्षित आहेत. सरकारचे त्याकडे दुर्लक्ष आहे. शहरात महाल आणि इंदोरा भागात रावणासह कुंभकर्ण आणि मेघनाथ यांच्या पुतळ्यांची निर्मिती केली जाते. गांधीगेट जवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एका छोटय़ा घरात अनेक वषार्ंपासून वास्तव्य करणारे हेमराजसिंग बिनवार घरी आणि उत्तर नागपुरातील इंदोरा भागात कागद आणि बांबूचा आधार घेत रावणााचे पुतळे तयार करीत आहेत. केवळ शहरात नाही तर शहराच्या बाहेरून त्यांच्याकडे मागणी वाढली आहे.
शहरातील विविध भागात आणि विदर्भात रावण दहनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यात ५० ते ६० फूट उंच अशा रावण, कुंभकर्ण आणि मेघनाथच्या पुतळ्यांचे दहन काही मिनिटात केले जात असले तरी ते तयार करण्यासाठी तीन ते चार महिने लागतात. शहरात रावणाचे पुतळे तयार करणारे कारागीर हेमराजसिंग बिनवार यांनी तयार केले आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून बिनेवार कुटुंबातील सदस्य दिवस रात्र काम करीत आहेत. यावेळी ४५ पेक्षा अधिक रावणाच्या वेगवेगळ्या आकारातील उंच असे पुतळे तयार केले आहेत.
रावणाचा पुतळा तयार करणे ही कला असून गेल्या अनेक वर्षांपासून ते जोपासत आहेत. बिनेवार यांनी सुरुवातीच्या काळात छंद म्हणून सुरू केलेल्या या कलेला काळानुरूप महत्त्व प्राप्त झाले असून आज त्यांच्याकडे मोठय़ा प्रमाणात मागणी वाढली आहे. इंदोरा भागातील सनातन संस्थेच्या सभागृहात आणि टिळक पुतळ्याकडून गांधीगेटकडे जाणाऱ्या मार्गावर शिवाजी पुतळ्याजवळ रावण, मेघनाथ, कुंभकर्ण यांचे पुतळे उभारण्याचे काम सध्या सुरू असून त्यावर अंतिम हात फिरवला जात आहे. वयाची ७५ उलटली तरी हेमराजसिंग तरुणांना लाजवेल अशा पद्धतीने आजही काम करीत असतात.
हेमराजसिंग यांच्याशी संवाद साधण्यात आला असता त्यांनी रावणाच्या पुतळ्याबाबतचा इतिहास उलगडला. पुतळ्याचे वेगवेगळे अवयव तयार केले जात असून त्याला रंगरंगोटी आणि अधिक आकर्षक केल्यानंतर ज्या ठिकाणी रावण दहनाचा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी तो प्रत्येक अवयव एकमेकाला जोडून रावणाचा पुतळा उभा केला जातो. जागेवर पुतळा उभा करताना आतमध्ये वेगवेगळे फटाके सुद्धा लावले जातात. अनेकदा पुतळा उभा करताना तो पडण्याची भीती असते. मात्र, असा प्रसंग आजपर्यंत आला नाही. रावण पुतळा जोडून उभा कण्यासाठी सात ते आठ तास लागतात आणि १५ ते २० कारागीर ते काम करीत असतात. ज्या ठिकाणी रावण दहनाचा कार्यक्रम असेल त्या ठिकाणी बिनवार परिवारातील लोक रावणाचा पुतळा उभा करुन देतात. ५० ते ६० फूट उंचीचा रावणाचा एक पुतळा तयार करण्यासाठी १५ ते २० हजार रुपये खर्च येतो.
नागपुरात रावण दहनाचा पहिला कार्यक्रम १९५२ मध्ये झाला. त्यावेळी इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समधील प्रा. ध्यानचंद यांनी पुढाकार घेतला होता. त्यावेळी ४०फूट उंचीचा रावण पुतळा तयार केला होता. पहिलीच वेळ असल्याने त्यावेळी माती, कागद, बांबूचा उपयोग करून पुतळा तयार करण्यात आला होता. मात्र, तो जड असल्यामुळे उचलायला त्रास होत असे. त्यावेळी रावण पुतळ्याचे शिर हे मातीचे होते. त्यामुळे रावण दहनाच्या आदल्या दिवशीपर्यंत पूर्ण रावण उभा झाला नव्हता.
वजनी अवयव उभारताना नाकीनऊ येत होते. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तर हे सर्व अवयव एकत्र ठेवून दहन करायचे ठरविले होते. पण माझा उत्साह शाबूत होता. मी रावणाच्या त्या पद्धतीने दहन
करायला तयार नव्हतो. अखेर रात्रभर जागून रावण पुतळा एकदाचा उभा केला. रावण दहन प्रथमच होत असल्यामुळे आणि त्यातही ४० फूट रावणाची शहरात बरीच चर्चा झाल्यामुळे मोठे आव्हान होते. कार्यक्रम पाहायला बरीच गर्दी लोटली होती.
गेल्या ४५ वर्षांतील रावण दहनाचा निरनिराळ्या घटनांचा उल्लेख करताना हेमराजसिंग सांगतात. १९७७ आणि १९८१ मध्ये नागपुरात रावण पुतळा बनविण्याच्या स्पर्धाच आयोजित करण्यात आल्या होत्या. रावणाचा पुतळा जरी मला बनवायचा होता, तरी मेघनाद आणि कुंभकर्ण बनविण्यासाठी आग्रा आणि दिल्लीचे कलावंत आले होते. त्यावेळी आम्ही ८० फूट उंचीचा रावण पुतळा बनविला. बाहेरचे कलावंत तर तो पाहून थक्कच झाले आणि त्यांनी आपणहून माघार घेतली.
केवळ कलेच्या सहाय्याने कलाकारांचे पोट भरत नाही. कागदापासून कला सादर करणाऱ्यांना समाजात आज कुठेच स्थान नाही. शासनाकडून कुठलेही संरक्षण नाही. पेपर आर्टची कला आज नष्ट होत आहे. ही कला साकारणारे नागपुरात निवडकच कलावंत आहेत. मात्र, शासन त्याची दखल घेत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून रावणाचे मोठमोठे पुतळे तयार केल्यानंतर त्याचे दहन केले जाते. मात्र, शासन आमच्या कलेची दखल घेत नाही. मधल्या काळात रावण पुतळा तयार करण्यासाठी काही सामाजिक संघटनांनी विरोध केला होता. त्यामुळे आमचा व्यवसाय बंद होतो की अशी भीती होती. त्यासाठी सनातन संस्थेने पुढाकार घेत विरोधकांना पटवून दिले. आजही काही संघटना विरोध करीत असतात. त्याच्या विरोधाकडे लक्ष देत नाही.
– हेमराजसिंग बिनवार, रावण पुतळे तयार करणारे कलावंत