scorecardresearch

चंद्रपूर : पालकमंत्री जाहीर होताच मुनगंटीवार ‘ॲक्शन मोड’मध्ये मूर्ती विमानतळप्रकरणी अधिकाऱ्यांना खडसावले

राजुरा तालुक्यातील मूर्ती विमानतळ देशाच्या संरक्षण दलाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे.

चंद्रपूर : पालकमंत्री जाहीर होताच मुनगंटीवार ‘ॲक्शन मोड’मध्ये मूर्ती विमानतळप्रकरणी अधिकाऱ्यांना खडसावले
पालकमंत्री जाहीर होताच मुनगंटीवार ‘ॲक्शन मोड’मध्ये मूर्ती विमानतळप्रकरणी अधिकाऱ्यांना खडसावले

राजुरा तालुक्यातील मूर्ती विमानतळ देशाच्या संरक्षण दलाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. या विमानतळाचे काम रखडल्यामुळे जिल्ह्यात येणारी जवळपास १० हजार कोटींची गुंतवणूक थांबली आहे. यामुळे विमानतळाचे रखडलेले काम विमानाच्याच गतीने पुढे गेले पाहिजे. सर्व परवानग्या तीन महिन्यात म्हणजे २४ डिसेंबर २०२२ पर्यंत मिळाल्याच पाहिजे. त्यासाठी काय करायचे ते तुम्हीच ठरवा. यापुढे कोणतेही कारण ऐकून घेतले जाणार नाही, अशा शब्दात राज्याचे वने, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना खडसावले.

नियोजन सभागृहात विमानतळाच्या सद्यस्थितीचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी संबंधित अधिकारी उपस्थित होते. २४ डिसेंबर २०२२ ही परवानग्या मिळवण्याची अंतिम तारीख अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावी. विमानतळ वेळेत झाले असते तर १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आली असती. याबाबत उद्योगपती रतन टाटा यांच्याशी बोलणेसुध्दा झाले होते. यातून जिल्ह्यातील किमान १० ते १५ हजार लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकला असता. यापुढे कोणतेही कारण ऐकूण घेणार नाही. विमानतळाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत त्याचे लोकार्पण करण्याचा आपला मानस आहे. त्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांनी कामाचे नियोजन करून रोज पाठपुरावा करावा, असे निर्देश पालकमंत्री मुनगंटीवार यांनी दिले.

‘सोलर फेन्सींग’बाबत आढावा
वन्यप्राण्यांचा संचार असलेल्या भागातील शेतकऱ्यांना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वन जन योजनेंतर्गत ‘सोलर फेन्सींग’ देण्याबाबत पालकमंत्री मुनगंटीवार यांनी आढावा घेतला. वन विभागाने ही प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे राबवावी. तसेच ई-निविदेपेक्षा साहित्य खरेदीसाठी संबंधित शेतकऱ्यांना कंपन्यांची निवड करू द्यावी. यासाठी साहित्य विकणाऱ्या सर्व कंपन्यांचे वन विभागाने एक पॅनेल तयार करावे. जेणेकरून शेतकऱ्याला स्वत:च्या पसंतीने साहित्य खरेदी करता येईल. ३३ टक्क्यांपेक्षा जास्त जंगल असणाऱ्या जिल्ह्यातील सर्व गावांना ‘सोलर फेन्सिंग’ देण्याबाबत मंत्रिमंडळात चर्चा केली जाईल, असे पालकमंत्री मुनंगटीवर यांनी सांगितले. सोलर फेन्सिंगकरीता जिल्ह्यातील ३१७ गावांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला असून लाभार्थी संख्या २८ हजार २९९ असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या

व्हिडिओ