नागपूर : शिवसेना पक्षात फुटीनंतर लोकसभा निवडणूकीत उद्धव ठाकरे गटाच्या पक्षाला आणि विधानसभा निवडणूकीत एकनाथ शिंदे गटाच्या पक्षाला मोठे यश मिळाले. राज्यात महायुतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरे गटात पुन्हा फुटीची चर्चा आहे. विदर्भात एकनाथ शिंदे लवकरच मोठ्या कार्यक्रमात पक्ष प्रवेश करणार असल्याने उद्धव ठाकरे गटाला खिंडार पडण्याचे संकेत आहे. त्याबाबत शिंदे गटाचे मंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी भाष्य केले आहे.

नागपुरातील प्रेस क्लबमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ॲड. जयस्वाल पुढे म्हणाले, राज्यातील विधानसभा निवडणूकीत महायुतीने मोठे यश मिळवले. शिवसेनेला (एकनाथ शिंदे गट) ५७ आणखी ३ अशा एकूण ६० जागा मिळाल्या. आम्ही ८० जागांवरच लढलो होतो. त्यामुळे राज्यात सर्वोत्तम कामगिरी आमच्या पक्षाची होती. या विजयाने खरी शिवसेना व धनुष्यबाण हा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचाच असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले. या विजयानंतर एकनाथ शिंदे यांनी सर्व मतदानसंघात आभार सभा घेण्याचे निश्चित केले होते.

विदर्भातील पहिली आभार सभा रामटेक मतदारसंघासाठी कन्हान येथील तेजाब कंपनीच्या मैदानात आयोजित करण्यात आले आहे. येथे जनतेने शिवसेनेला निवडून दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: आभार व्यक्त करण्यासोबतच काही नेत्यांचे शिवसेनेत पक्ष प्रवेशही करून घेतील. सध्या शिवसेना पक्षात येण्यासाठी मोठी रांग आहे. कुणाला प्रवेश द्यावा हे मात्र एकनाथ शिंदेसह वरिष्ठ नेतेच निश्चित करणार असल्याचेही जयस्वाल म्हणाले. याप्रसंगी आमदार कृपाल तुमाने यांच्यासह शिवसेनाचे बरेच पदाधिकारी उपस्थित होते.

स्थानिक स्वराज्य संस्थेबाबतही भाष्य

नागपूर जिल्हा परिषद, नागपूर महापालिकासह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मुद्यालवर ॲड. आशिष जयस्वाल म्हणाले, माझ्या माहितीप्रमाने महायुती राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्था एकत्रित लढणार आहे. परंतु त्याबाबतचे निर्णय हे शेवटी वरिष्ठ पातळीवरच ठरणार असल्याचेही ॲड. जयस्वाल यांनी सांगितले.

शरद पवार काय निर्णय घेणार?

महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झालेली दिसत आहे. शरद पवार यांचा पक्ष आणि इतर महाविकास आघाडीतील पक्षातील नेते एकमेकांवर आरोप करतांना दिसत आहे. शरद पवार काय निर्णय घेणार? याबाबत काहीही सांगता येत नाही, असेही ॲड. जयस्वाल यांनी सांगितले.

माजी आमदाराचाही प्रवेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमगाव विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार सहसराम कोरेटे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे देवरीला जाणार असल्याचेही ॲड. आशिष जयस्वाल यांनी सांगितले. या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसलाही मोठा धक्का बसणार आहे.