मुलगा दुष्यंत चतुर्वेदी यांनी शिवसेनेचे शिवबंधन बांधल्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे निलंबन मागे घेतले आहे. गेल्या निवडणुकीत चतुर्वेदी दक्षिण नागपुरातून लढले आणि पराभूत झाले. नागपूर महापालिका निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवून त्यांना पक्षाने निलंबित केले होते.
तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर शाई फेकण्यास आणि नागपूर महापालिका निवडणुकीत बंडखोरांना प्रोत्साहित केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. त्यासाठी त्यांना पक्षातून सहा वर्षांकरिता निलंबन करण्यात आले होते.
सतीश चुतर्वेदी यांनी निलंबन मागे घेण्यासाठी दिल्लीत खूप प्रयत्न केले. परंतु चव्हाण असेपर्यंत ते शक्य झाले नाही. प्रदेश कार्याध्यक्ष झाल्यानंतर डॉ. नितीन राऊत यांनी पक्षाकडे चतुर्वेदींचे निलंबन मागे घेण्याचा तगादा लावला. अखेर थोरात यांनी निलंबन मागे घेण्याचे पत्र बुधवारी काढले. या निर्णयामुळे नागपूर काँग्रेसमध्ये पुन्हा गटबाजी वाढण्याची शक्यता आहे.
चतुर्वेदी यांचे समर्थक तानाजी वनवे महापालिकेत विरोधी पक्षनेते आहेत, तर पक्षाचे शहराध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचे उजवा हात मानले जाणारे विकास ठाकरे आहेत. डॉ. नितीन राऊत आणि माजी मंत्री अनीस अहमद हे देखील चतुर्वेदींच्या बाजूने आहेत. दुसरीकडे मुत्तेमवार यांच्या गटात अॅड. अभिजित वंजारी, उमाकांत अग्निहोत्री आदी मंडळी आहेत. गेली पाच वर्षे मोर्चे, आंदोलन करून सरकारविरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी झटणारे वेगळे आणि उमेदवारी देताना ज्यांच्या नावाची चर्चा होते ते चेहरे वेगळे, अशी काँग्रेसची अवस्था झाली आहे. चतुर्वेदी यांच्या पक्षातील पुनरागमनाने अशी अवस्था पुन्हा येईल, असे निष्ठावान कार्यकर्त्यांना वाटत आहे. दरम्यान, प्रदेश कार्याध्यक्ष नितीन राऊत आणि शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी या विषयावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. सतीश चतुर्वेदी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
.. म्हणून सतीश चतुर्वेदी यांना पक्षातून निलंबित करण्यात आले
२०१७ मध्ये अशोक चव्हाण आणि चतुर्वेदी यांच्यात नागपूर महापालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून वाद झाला होता. प्रचारादरम्यान चव्हाण यांच्यावर एका कार्यकर्त्यांने शाई फेकली होती. चतुर्वेदी यांना याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. त्यानंतरही त्यांनी चव्हाण विरोधात सभा मोर्चेबांधणी सुरू ठेवली होती. अखेर त्यांना पक्षातून २२ फेब्रुवारी २०१८ ला निलंबित करण्यात आले होते.