अकोला : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसा नाही म्हणणारे सत्ताधारी विकास कामांच्या नावावर निधीची अक्षरश: उधळपट्टी करीत आहेत. सत्ताधारी भाजपा, शिंदे गट व अजित पवार गटाचे आमदार नाराज होऊ नये म्हणून त्यांना पोसण्यासाठीच राज्य शासनाची तिजोरी लुटली जात आहे, असा गंभीर आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी येथे केला.

अकोल्यात गुरुवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विजय वडेट्टीवार यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. केंद्र सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले. नऊ वर्षांमध्ये मोदी सरकारला महागाई कमी करता आलेली नाही. बेरोजगारी सातत्याने वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार देण्याची घोषणा केली होती. आता ते स्वत: कबुल करतात की नऊ वर्षांत केवळ नऊ लाख नोकऱ्या मिळालेल्या आहेत. नोकरीच्या नावावर सरकार तरुणांकडून कोट्यवधींचे परीक्षा शुल्क गोळा करून खासगी कंपन्यांना फायदा पोहोचवत आहेत. नरेंद्र मोदींनी चीन आणि पाकिस्तानला धडा शिकवण्याची भाषा केली होती. प्रत्यक्षात नऊ वर्षांपासून चीन, पाकिस्तानच्या कारवाया सुरूच आहेत.

हेही वाचा – वर्धा : पोलीस दिसणार आता अधिक तंदुरुस्त व फिट! जाणून घ्या कारण..

सरकारच्या सर्व कंपन्या विक्री केल्या जात आहेत. रेल्वेस्थानक, विमानतळाचे खासगीकरण केले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकही नवीन सरकारी कंपनी तयार केली नाही. आतापर्यंत काँग्रेसच्या काळात तयार केलेल्या जवळपास २९ संस्था विकून देश चालवण्याचा प्रकार सुरू आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांचे कर्जमाफ करीत नाही, मात्र उद्योगपतींचे कर्जमाफ केले जाते. केवळ हिंदू-मुस्लीम करून जातीय विष पेरण्याचे काम सरकार करीत आहे. राज्यामध्ये विविध जिल्ह्यांत दंगली घडत आहेत. राज्यात गुन्हेगारीतदेखील मोठी वाढ झाली. राज्य सरकार केवळ आमदारांना पोसण्याचे काम करीत आहे. तिजोरी लुटली जात आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ५० हजार कोटी देऊ शकत नाहीत. विकासाच्या नावावर मात्र कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. म्हाडासह सर्व विभागांतील कामे मर्जीतील कंत्राटदारांना दिली जात आहे, असा आरोपदेखील वडेट्टीवार यांनी केला.

हेही वाचा – चंद्रपूर : कारवाईचा बडगा; वर्षभरात ४८ हजार ६१५ थकबाकीदारांची बत्ती गुल

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला एक वर्ष पूर्ण झाले. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादाची धास्ती नरेंद्र मोदींनी घेतली आहे. राज्यात जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून शेतकरी, युवक, नागरिकांशी संवाद साधला जात असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, महानगराध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे, प्रदेश प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे, प्रदेश पदाधिकारी प्रकाश तायडे आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘दोन्ही बाजूने प्रतिसाद हवा’

‘इंडिया’ व मविआ आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या समावेशावर बोलताना ‘दोन्ही बाजूने प्रतिसाद मिळायला हवा’ असे सूचक विधान विजय वडेट्टीवार यांनी केले. एकत्र येण्यासाठी दोघांनीही हात समोर करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.