उपराजधानीतून इंग्लंडला गेलेले ५० तरुण बेपत्ता झाल्याच्या प्रकरणाचा तपास नागपूर पोलिसांसह राज्याचे दहशतवादी विरोधी पथक (एटीएस) व गुप्तचर विभागाने (आयबी) सुरू केला आहे.

गेल्या तीन वर्षांत नागपुरातील काही दाम्पत्यांनी काही मुस्लिम तरुणांना स्वत:ची मुले दाखवून बनावट ओळखपत्र तयार करून पासपोर्ट, व्हिसा मिळविला व त्यांना घेऊन इंग्लंडला गेले. व्यापार, उद्योगाच्या निमित्ताने गेलेले हे तरुण अद्याप परतले नाहीत. व्हिसाची मुदत संपल्यानंतर ब्रिटिश प्रशासनाने शोध घेतला असता ते सापडले नाहीत. त्यामुळे मुंबईतील ब्रिटिश उपउच्चायुक्त कार्यालयातर्फे नागपूर पोलीस आयुक्तांना ही माहिती दिली. गुन्हे शाखेचे तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांनी तपास केला असता पासपोर्ट व व्हिसा तयार करण्याच्या प्रक्रियेत मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले. हिवाळी अधिवेशनामुळे या प्रकरणाकडे पोलिसांचे काही प्रमाणात दुर्लक्ष झाले होते.  रविवारी यासंदर्भात ‘द इंडियन एक्सप्रेस’ आणि ‘लोकसत्ता’ने वृत्त प्रकाशित केल्यावर एकच खळबळ उडाली. त्यानंतर आता एटीएस व आयबीनेही या प्रकरणात लक्ष घातले असून संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्याची माहिती आहे. या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.

‘‘प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित असून चौकशीतील घाई प्रकरणाला वेगळी कलाटणी देऊ शकते. त्यामुळे पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात आहे.’’

– संभाजी कदम, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा.