नागपूर : शेजारी राहत असलेल्या एका युवकाने अल्पवयीन मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून घरात नेले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करीत होता. तोच मुलीच्या शोधात तिची आई तेथे पोहचली अन् अनर्थ टळला. वस्तीतील महिलांनी आरोपी युवकाला चोप दिला. त्यानंतर पारडी पोलिसांच्या ताब्यात दिले.

पारडी हद्दीत राहणारी चार वर्षीय मुलगी ही तिच्या आई-वडिलांसोबत राहते. वडिल बांधकाम मजुरीचे काम करतात. आरोपी युवक हा आरामशीनवर काम करतो. पीडित मुलगी आणि आरोपी एकाच परिसरात राहतात. त्यामुळे दोन्ही कुटुंबातील संबंध होते. सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास आरोपी युवक आणि पीडित मुलगी दोघेही क्रिकेट खेळत होते. यावेळी, मुलीवर त्या युवकाची वाईट नजर गेली. तिला त्याने घरी नेले आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होता.दरम्यान मुलगी घराबाहेर दिसत नसल्याने आईची वस्तीत शोधाशोध सुरू होती. एका शेजारी महिलेने मुलगी आरोपी युवकासोबत घरी जाताना दिसल्याचे सांगितले. आई त्याच्या घरी पोहोचली असता दिसलेले दृष्य बघून तिच्या पायाखालीची वाळूच सरकली. तिने आरडाओरड केल्याने नागरिकही जमा झाले. घटनेची माहिती कळताच पोलिसही घटनास्थळी पोहोचले. येथूनच पोलिसांनी आरोपी युवकाला ताब्यात घेतले.

आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली

वस्तीतील महिलांनी त्याला घरात डांबून ठेवले आणि पारडी पोलिसांना फोनवरुन माहिती दिली. काही मिनिटातच पोलीस घटनास्थळावर पोहचले. तोपर्यंत महिलांनी आरोपी युवकाला चांगला चोप दिला. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि माफी मागितली. असे कृत्य पुन्हा न करण्याचे आश्वासन दिले. मात्र, महिलांनी त्याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचारात वाढ

गेल्या वर्षात उपराजधानीत अल्पवयीन मुलींचा विनयभंग आणि लैंगिक अत्याचारात सातत्याने वाढ झाल्याचे दिसत आहे. तसेच जानेवारी महिन्यांत जवळपास १४ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटना आणि विनयभंग केल्याच्या घटना उघडकीस आल्या. त्यामुळे गृहमंत्र्याच्या शहरातील अल्पवयीन मुलींच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या वर्षांत २९७ महिला आणि मुलींवर बलात्काराच्या घटनांची नोंद नागपूर पोलिसांमध्ये आहे. त्यावरुन लैंगिक अत्याचाराच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी गांभीर्य दाखवावे लागेल.