बुलढाणा : बुलढाणा येथील रहिवासी शेख अहमद शेख समद ( वय ३६ वर्षे, राहणार आरास ले आऊट, जुनागांव, बुलढाणा ). या महाशयाचा ‘जॉब’ म्हणजे चोरी. त्यासाठी त्याने एक तरबेज टीम देखील तयार केली. चोरीसाठी तो बुलढाणा ते शेगाव असे ‘अप -डाऊन’ करताे. म्हणजे राहायचे बुलढाण्यात आणि चोरी करायची बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमध्ये.
नेहमीच्या या कार्यपद्धती प्रमाणे शेख अहमद आपल्या चमूसह शेगावात पोहोचला. त्याने विद्या नगर परिसरातील कमलसिंग परिहार यांच्या समोरील दाराचे कुलूप तोडले. तसेच त्यांच्या शेजारी राहणाऱ्या देवलाल महादेव ढगे यांच्या घराचे कुलुप तोडून घरफोडीचा प्रयत्न केला. मात्र शेजाऱ्यांचा आवाज आल्याने त्याने तिथून पळ काढला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली.
दरम्यान, आरोपी शेख अहमद शेख समद हा त्याची ( एमएच ४८ १२०५ क्रंमाकाची) कार घेऊन पळून जात असताना त्याची कार झाडाला धडकली. शेख अहमद शेख समद पोलिसांच्या हाती लागला व इतर साथीदार फरार झाले आहेत. या प्रकरणी शेगाव पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
आरोपीकडून टाटा टिगोर कार, नगदी १५हजार रुपये, घरफोडीचे औजार असा एकूण ९ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली शेगावचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील, कुणाल जाधव,हवालदार गणेश वाकेकर, गजानन वाघमारे, संतोष गवई, नीलेश गाडगे आदींनी केली.
चौकशीमध्ये आरोपी शेख अहमद याने ६ गुन्हयांची कबुली दिली आहे. तसेच त्याच्या कार्य पद्धतीची माहितीही दिली.शेगाव मधील विविध वस्त्या, वसाहती, सदनिका मध्ये ‘रेकी’ करायची, बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून घरातील किमती वस्तू, रोख, दागिने लंपास करायचे अशी त्याची कामाची पद्धत होती.