चंद्रपूर : ऑरो इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने गावांच्या पुनर्वसनापूर्वीच खाणीचे काम सुरू करून तीन लाख मेट्रिक टन कोळसा खुल्या बाजारात विक्री केल्याचा खळबळजनक आरोप खासदार प्रतिभा धनोरकर यांनी केला. कंपनीने १०० कोटींची रक्कम भरून पुनर्वसनाचे काम सुरू करावे, भद्रावती तालुक्यातील बेल्लोरा, टाकळी, जेना गावांतील ग्रामस्थांना ३० लाख रुपये प्रतिएकर मोबदला द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मात्र, कंपनी २६ लाख रुपयांपेक्षा अधिक दर देण्यास तयार नाही. त्यामुळे या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न चांगलाच चिघळला आहे.

खासदार धानोरकर, आमदार करण देवतळे, जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, कंपनीचे अधिकारी रेड्डी आणि प्रकल्पग्रस्तांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक चांगलीच गाजली.

या कोळसा खाण प्रकल्पासाठी परिसरातील एकूण ११ गावांची जमीन खरेदी केली जाणार आहे. बेल्लोरा गावाचे पुनर्वसन केले जाईल. प्रकल्पासाठी ९३६ हे. जमीन भाडेपट्ट्याअंतर्गत देण्यात आली, त्यापैकी ७०.४३ हे. जमीन आधीपासूनच कंपनीच्या ताब्यात आहे. उर्वरित ८३९.८३ हेक्टर खासगी आणि २५.७४ हेक्टर शासकीय जमीन अद्याप कंपनीने खरेदी केलेली नाही. ताब्यात असलेल्या जमिनीतून कोळसा उत्खननाचे काम सुरू आहे.

बेल्लोरा गाव या खाणीच्या शेजारी आहे, त्यामुळे या गावाच्या पुनर्वसनाचा निर्णय घेण्यात आला. परंतु पुनर्वसनासाठी ठरवलेले दर गावकऱ्यांना मान्य नाहीत. कंपनीने जमीन अधिग्रहणासाठी २६ लाख रुपये प्रतिएकरपेक्षा अधीक देण्यास स्पष्ट नकार दिला असल्याचे गावकऱ्यांनी बैठकीत सांगितले. किमान ८० ते १०० एकर जमिनीची विक्री कंपनीने करून दिल्याशिवाय बेल्लोरा, टाकळी आणि जेना या गावांचे ग्रामदैवत भंगाराम मंदिर हटवू देणार नाही, अशी ठाम भूमिका खासदार धानोरकर यांनी घेतली. त्यांच्या मध्यस्थीने अकृषक जमिनीसाठी दुप्पट मोबदला आणि घर तसेच पुनर्वसनासाठी २३ ऐवजी २६ लाख रुपये मोबदला देण्याचे निश्चित झाले. मात्र, ग्रामस्थांनी ३० लाख रुपये मिळावे, अशी भूमिका घेतली. तसेच कंपनीने बंद केलेला गावातील ग्रामदैवत भंगाराम मंदिराचा रस्ता पुर्ववत सुरू करण्याची मागणीही केली. जोपर्यंत योग्य करारनामा होत नाही, तोपर्यंत गावकरी घरे व जमिनी देण्यास इच्छुक नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीत कोणताही करारनामा होऊ शकला नाही. कंपनीने जमीन अधिग्रहणासाठी २६ लाख रुपये प्रतिएकरपेक्षा अधीक देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मात्र, हे दर गावकऱ्यांना मान्य नाहीत. यामुळे पुनर्वसनाचा प्रश्न चांगलाच चिघळला आहे.

नेतेच बनले कंत्राटदार

बैठकीत गावकऱ्यांनी ऑरो इन्फ्राच्या अधिकाऱ्यांचा खोटारडेपणा पुराव्यासह उघड केला. याचबरोबर प्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांचाही बुरखा फाडला. भद्रावती पंचायत समितीचे माजी सभापती प्रवीण ठेंगणे यांनी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मांडल्या. मात्र, त्यांच्या पक्षाचे आकाश वानखेडे यांनी ठेंगणे यांचा खोटारडेपणा उघड केला. ठेंगणे यांना बेल्लोरा गावापर्यंतचा रस्ता बांधण्यासाठी तीन कोटींचे कंत्राट मिळाले होते, असा आरोप वानखेडे यांनी केला. या आरोपावर ठेंगणे यांनी मौन बाळगले.