नागपूर: महाराष्ट्र शासनाने दुचाकी टॅक्सीला मंजूरी देत ऑटोरिक्षा चालकांचा रोजगार हिरावण्याचा घाट रचला आहे. त्याविरोधात ऑटोरिक्षा चालकांमध्ये संताप आहे. या ऑटोरिक्षा चालकांना न्याय मिळवून देण्यासाठी ऑटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्रतर्फे राज्यातील सर्वच आरटीओ कार्यालय परिसरात धरणे देत कार्यालयांनाच घेराव घातला जाणार आहे.
नागपुरातील आरटीओ कार्यालय परिसरात टायगर ऑटोरिक्षा संघटना, नागपूरतर्फे आंदोलन केले जाणार आहे. त्यानंतर येथे विविध विकास कामे सुरू असल्याने हे आंदोलन संविधान चौकावर होईल, असे आंदोलकांकडून स्पष्ट केले गेले. ऑटोरिक्षा चालकांचे नेते विलास भालेकर म्हणाले, बेरोजगार युवकांना स्वयंरोजगाराची संधी देण्याच्या नावाखाली ई-बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने रोजगार निर्मितीच्या नावाने ई-बाईक टॅक्सीला दिलेली मंजूरी राज्यातील ऑटोरिक्षा चालकांच्या जीवावर उठणार आहे. त्यामुळे प्रामाणीकपने प्रवासी सेवा देणारे ऑटोरिक्षा चालक देशोधडीला लागेल.
महायुती सरकार राज्यात नवीन रोजगार निर्मिती करण्यात अपयशी ठरली आहे. त्यामुळे तरुणांमध्ये रोजगाराचा दिखावा निर्माण करण्यासाठी हा दुचाकी टॅक्सीचा खेळ सुरु केला आहे. नवी रोजगार निर्मिती म्हणजे जुन्या रोजगाराला धक्का लागायला नको. परंतु नवीन रोजगाराच्या नावाने ऑटोरिचा चालकांचा रोजगार हिरावला जाणार असल्याने या दुचाकी टॅक्सीला आमचा विरोध असल्याचेही भालेकर यांनी सांगितले.
शासनाने तातडीने दुचाकी टॅक्सीची मंजूरी रद्द न केल्यास राज्यातील १५ लाख ऑटोरिक्षा चालक रस्त्यावर उतरून तिव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही भालेकर यांनी दिला. त्याचाच एक भाग म्हणून २१ मे रोजी राज्यातील सर्व आरटीओ कार्यालय परिसरात धरणे व आरटीओ कार्यालयांना घेराव घालणार असल्याचेही भालेकर यांनी सांगितले. नागपुरातील आंदोलन विलास भालेकर, जावेद शेख, अतिश शेंडे, राजू इंगळे, नरेंद्र वाघमारे, सुमित भालेकर, वैभव कांबळे यांच्या नेतृत्वात होणार आहे.
भांडवलदाराच्या घश्यात व्यवसाय…
शासनाने यापूर्वीही दुचाकी टॅक्सीचा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तो फसला. आता पुन्हा उरापती करत शासन ई-बाईक टॅक्सी आणत आहे. ई-बाईक टॅक्सी प्रवासी वाहतुकीसाठी सुरक्षित नाही, ई-बाईक टॅक्सीमुळे ऑटोरिक्षा चालकांचा प्रवासी वाहतुकीचा स्वतंत्र व्यवसाय संतुष्टत येईल आणि पूर्ण व्यवसाय हा भांडवलदारांच्या घश्यात जाईल. कारण या दुचाकी टॅक्सीच्या कंपन्या भांडवलदारांच्या असल्याचे भालेकर यांनी सांगितले.