यवतमाळ : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली इथपर्यंत ठीक होतं, पण त्यांनी पक्ष आणि चिन्ह घेऊन जायला नको होतं, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला. अंबोडा येथे सभेसाठी मार्गस्थ झालेल्या सात बारा कोरा पदयात्रेदरम्यान ते बोलत होते. शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव तसेच दिव्यांगांना दरमहा अर्थसहाय्य दिले जावे, यासाठी कडू यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पापळ येथून शेतकऱ्यांची पदयात्रा सुरु केली. आज, सेामवारी यात्रेच्या सातव्या दिवशी अंबोडा येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. तेथे जात असताना कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
बंडखोरी केली ते ठीक, परंतु त्यांनी पक्ष आणि चिन्ह घेऊन जायला नको होतं, या शब्दात त्यांनी शिंदेंवर टीका केली. पदयात्रेच्या सातव्या दिवशी अंबोडा येथे सभा आयोजित करण्यात आली होती. पदयात्रेतून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला जावा, शेतमालाला हमीभाव देण्यात यावा, दिव्यांगांना दरमहा सहा हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जावे, या प्रमुख मागण्यांच्या पुर्ततेसह मेंढपाळ तसेच मच्छीमारांच्या विविध प्रश्नांना घेऊन वाचा फोडली जात आहे. सरकारने डोळ्यावर बांधलेली पट्टी फाडणार असे म्हणत ही यात्रा सुरू आहे. सहभागी शेतकरी व दिव्यांग बांधवांनी डोळ्यांवर काळी पट्टी बांधून, हातात विळा व रूमण घेतले आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि दिव्यांगांच्या न्यायासाठी सुरू असलेल्या या आंदोलनाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
२४ जुलै रोजी महाराष्ट्र बंद
या आंदोलनाचा समारोप महागाव तालुक्यातील अंबोडा येथे आज सोमवारी झाला. बच्चू कडू यांनी या वेळी राज्य शासनाच्या कृषी आणि कर्जविषयक धोरणांवर तीव्र टीका केली. शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी आत्महत्या करत आहे आणि सरकार आंधळं बनलं आहे, असा आरोप त्यांनी केला. हा लढा आता निर्णायक टप्प्यावर आला असून सरकारला गुडघ्यावर आणल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. या आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून येत्या २४ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्र बंद आणि चक्काजाम आंदोलनाची घोषणा बच्चू कडू यांनी यावेळी केली. शेतकऱ्यांची ही लढाई मागण्यांसाठी नसून स्वाभिमानासाठी आहे. शेतकऱ्यांना स्वत:च्या हक्कांप्रती जागे करण्यासाठी ‘सातबारा कोरा कोरा’ ही पदयात्रा निर्णायक ठरली असून शासनाने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले नाही तर भविष्यात हे शेतकरी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी कडू यांनी दिला.