अमरावती : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या गावी चहा विकत होते. मी त्या ठिकाणी जाऊन आलो आहे. चांगले कँटिन आहे. मी नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारू इच्छितो की, एक कप चहा सात आणि दहा रुपयांमध्ये विकला जातो, नरेंद्र मोदी हे पाच रुपयांमध्ये चहा विकत होते. त्यात अर्धे पाणी आपण टाकत होते. चहा, साखर आणि गॅसचा खर्च जोडूनही १५० टक्के नफा आपण कमवत होते. तुम्ही १५० टक्के नफा कमावणार आणि आम्हा शेतकऱ्यांच्या पिकाला केवळ १५ टक्के नफा, हा कुठला न्याय आहे, असा सवाल प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केला.

चांदूर बाजार तालुक्यातील बेलोरा येथे गुरूवारी रात्री आयोजित शेतकरी, शेतमजूर, महिलांच्या सभेत बोलताना बच्चू कडू यांनी सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. बच्चू कडू म्हणाले, शेतमालाला केवळ १५ टक्के मिळत असेल, तर शेतकरी जगणार कसा, याचा विचार पंतप्रधानांनी केला पाहिजे. राज्याच्या कृषीमूल्य आयोगाने सोयाबीनला ७ हजार ७० रुपये क्विंटल दर मिळावेत, अशी शिफारस केली, पण केंद्र सरकारने ५ हजार २२८ रुपये भाव जाहीर केले. आता सोयाबीन पीक शेतात आहे. त्यातले अर्धेच पीक हाती येणार आहे. बाजारात सध्याच ३ ते ३ हजार ५०० रुपये भाव मिळत आहे. नवीन सोयाबीन निघाल्यावर भाव वाढतील का, हे नरेंद्र मोदी यांनी सांगावे.

बच्चू कडू म्हणाले, जात आणि धर्मासाठी एकत्र येणाऱ्या नागरिकांना शेतकऱ्यांसाठी एकत्र येता येत नाही, हे दुर्दैव आहे. राज्यात शेतकरी हिताचे सरकार असते, तर एकाच दिवसात तेरा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसत्या. आत्महत्यांच्या आकड्यांनी हादरलेल्या महाराष्ट्रात आता संघर्षाशिवाय दुसरा मार्ग उरलेला नाही.‘बळीराजा’च्या सातबारावर कर्जमुक्तीचा अभिषेक आणि शेतमालाला रास्त हमीभाव मिळाल्याशिवाय आता ही लढाई थांबणार नाही, असा इशारा राष्ट्रीय किसान मोर्चाचे अध्यक्ष राकेश टिकेत आणि आमदार बच्चू कडू यांनी दिला. आत्महत्येच्या गर्तेत अडकलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांनी आता ‘आत्महत्येची नाही, तर हक्कासाठी लढाईची तयारी ठेवा’ असे आवाहन त्यांनी केले.

२८ ऑक्टोबरला नागपूरमध्ये रणशिंग

शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या सरकारला जागे करण्यासाठी येत्या २८ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे मोठे आंदोलन पुकारण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन बच्चू कडू यांनी केले.