अमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. अनेक नेते त्यांना ‘एक्स’वर पोस्ट करत शुभेच्छा देत आहेत. दरम्यान माजी राज्यमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी “आपण खऱ्या अर्थाने कीर्तीवंत व्हावे, आमचे कुणाशीही वैर नाही”, असे म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. बच्चू कडू यांच्या या पोस्टची सर्वत्र चर्चा होत आहे.
“आपल्या हाती महाराष्ट्राचे सर्वोच्च पद आहे. आता काळाची गरज आहे की, आपण खऱ्या अर्थाने कीर्तीवंत व्हावे. आम्ही पुकारलेल्या लढ्यातील मागण्यांना आपण मान्यता देऊन समस्त कष्टकरी, शेतकरी, वंचित, दिव्यांग जनतेला दिलासा द्यावा. आमचे कुणाशीही वैर नाही. मागण्या पूर्ण झाल्यास कष्टकरी समाजाच्या मैत्रीचे नवे पर्व सुरू होईल, मन:पूर्वक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”, असे बच्चू कडू यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारने समिती गठित केली असली, तरी बच्चू कडू यांचे समाधान झालेले नाही. जोपर्यंत कर्जमाफीसाठी ठोस भूमिका घेतली जात नाही, दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळत नाही, तोपर्यंत संघर्ष सुरूच राहणार असल्याचे बच्चू कडू यांचे म्हणणे आहे. बच्चू कडू यांनी येत्या २४ जुलैला राज्यभरात ‘चक्काजाम’ आंदोलनाची घोषणा केली आहे.
कर्जमाफीसाठी सरकारने समिती नेमली असली, तरी त्यातून कोणताही अर्थबोध होत नाही. समिती ही कर्जमाफीसाठी आहे की उपाययोजनांसाठी, हेच कळत नाही. त्यामुळे जोपर्यंत कर्जमाफीसंदर्भात ठोस भूमिका घेतली जात नाही, कर्जमाफीची तारीख सांगितली जात नाही, तोपर्यंत संघर्ष सुरूच राहणार असल्याचे बच्चू कडू यांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष, शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रीय समाज पक्ष, महाराष्ट्र स्वराज्य पक्ष आणि इतर अनेक पक्षांनी तसेच विविध संघटनांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
बच्चू कडू यांनी समाज माध्यमांवर व्यक्त होताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, सोबत कर्जमाफीच्या आश्वासनाची आठवण देखील करून दिली आहे. बच्चू कडू यांनी गेल्या महिन्यात शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांच्या मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन केले होते. सरकारने आश्वासन दिल्यानंतर बच्चू कडू यांनी आंदोलन सात दिवसांनी मागे घेतले, पण त्यानंतर त्यांनी आठवडाभर पदयात्रा काढली. या पदयात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आता त्यांची ‘चक्काजाम’ आंदोलनाची घोषणा केली आहे.