अमरावती : बडनेरा जुनीवस्ती परिसरात गेल्या २२ ऑगस्ट रोजी अतुल पुरी या महाविद्यालयीन कर्मचाऱ्याची हत्या झाली होती. याप्रकरणी गुन्हे शाखेने आणखी तीन आरोपींना अटक केली असून, यामध्ये अतुल पुरी यांच्या मेहुण्यानेच त्यांच्या हत्येची सुपारी दिली असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, याप्रकरणी आतापर्यंत एकूण पाच आरोपींना अटक झाली असून, त्यांना मदत करणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

राहुल भगवंत पुरी (३६) रा. माणीकवाडा धनज जि. यवतमाळ, प्रशांत भाष्कर वऱ्हाडे (४२) रा. माणीकवाडा धनज (ह. मु. पार्वतीनगर अमरावती) व गौरव गजानन कांबे (२९) रा. राठीनगर अमरावती अशी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची, तर अक्षय प्रदीप शिंपी (३०) रा. गणेडीवाल ले-आउट, कॅम्प, अमरावती असे पसार असलेल्या आरोपीचे नाव आहे. यातील आरोपी राहुल पुरी हा मृतक अतुल पुरी यांचा मेहुणा आहे. गेल्या काही वर्षांपासून अतुल हा त्याच्या पत्नीला शारीरीक व मानसिक त्रास देत असल्याने राहुलचा अतुलवर राग होता.

बहिणीवरील अत्याचाराचा सूड घेण्यासाठी राहुलनेच अतुलच्या हत्येचा कट रचला. त्यासाठी त्याने प्रशांत वऱ्हाडे याच्या मदतीने अक्षय शिपीला हत्येची सुपारी दिली. अक्षय शिंपी व त्याचा मित्र गौरव कांबे यांनी त्यासाठी ५ लाख रुपये रोख रक्कम घेतली. त्यानंतर अक्षय व गौरवने यापूर्वीच अटक असलेल्या आरोपीना त्यातील २ लाख रूपये देऊन अतुलची हत्या करण्यास सांगितल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. गुन्हे शाखेचे पथक अक्षय शिंपीच्या मागावर असून, अटक झालेल्या तीन आरोपींना पुढील कारवाईसाठी बडनेरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, पोलीस उपायुक्त श्याम घुगे, रमेश धुमाळ, साहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनात तसेच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

या कारवाई पथकात साहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कडू, मनीष वाकोडे, महेश इंगोले, अनिकेत कासार, पोलीस कर्मचारी सुनील लासूरकर, दीपक सुंदरकर, गजानन ढेवले, फिरोज खान, सतीश देशमुख, आस्तीक देशमुख, मनोज ठोसर, जहीर शेख, सचिन बहाळे, संग्राम भोजने, मंगेश शिंदे, अतुल संभे, नईम बेग, विकास गुडधे, नाझीमोददीन, विशाल वाकपांजर, राहुल देंगेकर, राजीक रायलीवाले, रंजीत गावंडे, सुरज चव्हाण, निलेश वंजारी, संदीप खंडारे, राहुल दुधे. चेतन शर्मा, अलीमोददीन खतीब यांचा समावेश होता.